यंदाच्या हंगामात चांगली लागवड, संत्र्यांची गोडीही वाढली
पुणे : यंदाच्या हंगामात नागपूर संत्र्यांची गोडी वाढणार असून चांगल्या पावसामुळे संत्र्यांची लागवड मोठ्या प्रमाणावर झाली आहे. किरकोळ बाजारात प्रतवारीनुसार एक किलो संत्र्यांची विक्री ६० ते १०० रुपये दराने केली जात आहे.
श्री छत्रपती शिवाजी मार्केट यार्डातील फळबाजारात दररोज ४० ते ५० टन संत्र्यांची आवक होत आहे. नागपूर, परतवाडा, अंजनगाव, अचलपूर, वरूड, चिखली, अमरावती भागातून संत्र्यांची आवक होत असून यंदाच्या वर्षी पाऊस चांगला झाल्याने संत्र्यांची लागवड मोठ्या प्रमाणावर झाली असल्याची माहिती मार्केट यार्डातील फळव्यापारी करण जाधव यांनी दिली.
यंदाच्या वर्षी पाऊस वेळेवर सुरू झाला. त्यामुळे संत्र्यांची लागवड चांगली झाली तसेच प्रतवारीही वाढली. त्यामुळे गतवर्षीच्या तुलनेत यंदा घाऊक आणि किरकोळ बाजारात संत्र्यांना चांगले दर मिळाले आहेत. हंगामाच्या सुरूवातीला बाजारात नागपूरहून चार ते पाच टन संत्र्यांची आवक होत होती. हंगामाच्या पहिल्या टप्यात संत्री आंबट होती. त्यानंतर आता हंगाम बहरात आला असून संत्र्यांची गोडी वाढली आहे. संत्र्यांचा आकार आणि प्रतवारीही चांगली असल्याने नागपूरमधील संत्र्यांना परराज्यातून मोठी मागणी आहे. ज्यूस विक्रेते, उपाहारगृहचालकांची मागणी वाढली आहे, असे जाधव यांनी सांगितले. घाऊक बाजारात संत्र्यांच्या आठ ते दहा डझनाच्या पेटीस ८०० ते एक हजार रुपये, अकरा ते बारा डझनाच्या पेटीस (लहान आकाराचे फळ) ७०० रुपये तसेच चौदा डझनाच्या पेटीस (लहान आकाराचे फळ) ६०० रुपये असे दर मिळत आहे.
यंदाच्या हंगामात नागपूर संत्र्यांची लागवड चांगली आहे. संत्र्यांची प्रतवारीही चांगली असून गोडीही वाढली आहे. नागपूर संत्र्यांचा हंगाम ऑक्टोबर महिन्यात सुरू होतो. जानेवारी महिन्यापर्यंत संत्र्यांची आवक सुरू असते. – करण जाधव, फळ व्यापारी, श्री छत्रपती शिवाजी मार्केटयार्ड