पुणे : बुधवार पेठेतून निघालेल्या संगणक अभियंता आणि त्याच्या मित्राची मोबाइल चित्रफीत तयार करून त्याला धमकावून खंडणी मागण्यात आली. संगणक अभियंता तरुणाचा नांदेड सिटीपर्यंत पाठलाग करून आरोपींनी चित्रफीत प्रसारित करण्याची धमकी देऊन खंडणी मागण्याचा प्रयत्न केला. या प्रकरणी नांदेड सिटी पोलिसांनी दोघांना अटक केली.

या प्रकरणी दोघांना अटक करण्यात आली. याबाबत एका संगणक अभियंता तरुणाने नांदेड सिटी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार तरुण सिंहगड रस्ता भागातील किरकिटवाडी परिसरात राहायला आहे. तो आणि त्याचा मित्र बुधवार पेठेत कामानिमित्त १३ जुलै रोजी आले होते. अभियंता तरुण दुचाकीवर थांबला होता. त्या वेळी आरोपींनी मोबाइलवर चित्रीकरण केले. त्यानंतर अभियंता आणि त्याचे मित्र दुचाकीवरून घरी आले. आरोपींनी दोघांचा घरापर्यंत पाठलाग केला.

नांदेड सिटी परिसरात दोघांना अडविले. ‘तुम्ही बुधवार पेठेत कशाला आला होता,’ अशी विचारणा केली. त्यानंतर आरोपींनी दोघांना धमकाविण्यास सुरुवात केली. ‘तुम्ही आमच्याकडून २० हजार रुपये घेतले आहेत,’ असे सांगून त्यांच्याकडे पैशांची मागणी केली. आरोपींनी पोलीस नियंत्रण कक्षाला दूरध्वनी केला. त्यांच्यात वादावादी झाली. त्यानंतर नांदेड सिटी पोलिसांनी अभियंता तरुणासह आरोपींना चौकशीसाठी बोलावले. पोलिसांना हे प्रकरण संशयास्पद वाटल्याने तपास सुरू केला. पोलिसांनी सीसीटीव्ही चित्रीकरण तपासले. पोलिसी खाक्या दाखविताच आरोपींनी कबुली दिली.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

आरोपींनी अशा पद्धतीने आणखी काही जणांकडून खंडणी उकळल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. ‘याबाबत पोलिसांकडे तक्रार आल्यानंतर पोलिसांनी तपास सुरू केला होता. सीसीटीव्ही चित्रीकरणात हा प्रकार उघड झाला,’ असे नांदेड सिटी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अतुल भोस यांनी सांगितले.