वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबद्दल मोठं विधान केलं आहे. कर्नाटक, केंद्रातील सत्ता गेल्यावर नरेंद्र मोदी सुद्धा तुरुंगात जाऊ शकतात. जे काही पेरलेलं असते, तेच उगवते. त्यामुळे मोदींनी जे पेरलं आहे, तेच उद्याच्या राजकारणाचा भाग होईल, अशी परिस्थिती दिसते, असं मत प्रकाश आंबेडकर यांनी व्यक्त केलं.

पिंपरीत वडार समाजाचा मेळावा आयोजित करण्यात आला होता. त्यानंतर प्रकाश आंबेडकर यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. “राजकारणात चोरांना पंतप्रधान नरेंद्र मोदी पकडत आहेत. मात्र, त्यांचं पकडणे मी गैर मानतो. कारण, पकडल्यावर ती प्रकरणे पूर्णत्वास जात नाहीत. तीन चार वर्षे कारागृहात ठेवून भीतीचं वातावरण निर्माण केलं जातं. हे मानसिकतेवर आघात करण्याचं धोरण आहे.”

हेही वाचा : “…तर अजित पवारांनी स्वत:च्या नावासमोर मुख्यमंत्री लावावं”, भाजपा मंत्र्याचं विधान

“त्यामुळे कर्नाटक आणि केंद्रातील सत्ता गेल्यावर नरेंद्र मोदीही तुरुंगात जाऊ शकतात. जे काही पेरलेले असते, तेच उगवते. म्हणून मोदींनी जे पेरलं आहे, तेच उद्याच्या राजकारणाचा भाग होईल,” असेही प्रकाश आंबेडकरांनी सांगितलं.
भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष ब्रिजभूषण सिंह यांच्यावर प्रकाश आंबेडकरांनी भाष्य केलं आहे.

“पोस्कोचा गुन्हा दाखल झाल्यावर तातडीने अटक होते. मात्र, गुन्हा दाखल होऊनही ब्रिजभूषण सिंह यांना अटक झाली नाही. दुर्दैवाने सर्वोच्च न्यायालयात गेल्यानंतर गुन्हा दाखल झाला आहे. आता तुमचा प्रश्न मिटला असे न्यायाधीशांनी म्हणणे चुकीचे आहे. पोस्कोचा गुन्हा दाखल झालेल्या आरोपीला कधी पकडणार हे न्यायालयाने विचारलं पाहिजे,” असं प्रकाश आंबेडकरांनी म्हटलं.

‘द केरला स्टोरी’चित्रपटावरही प्रकाश आंबेडकरांनी मत व्यक्त केलं आहे. “‘केरला स्टोरी’ चित्रपटामध्ये घेण्यासारखं काही नसणार आहे. तो प्रसिद्धीचा प्रयत्न आहे,” असं प्रकाश आंबेडकरांनी सांगितलं.

हेही वाचा : “ठाकरे आणि पवारांच्या कार्यकाळात मंत्रालयात हजारो दारूच्या बाटल्या…”, सुधीर मुनगंटीवारांचा गंभीर आरोप

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मुख्यमंत्री होण्याची इच्छा आहे का? असा प्रश्न विचारल्यावर प्रकाश आंबेडकर म्हणाले, “मी आपला साधा कार्यकर्ता आहे. कार्यकर्ता म्हणूनच मी आनंदी आहे. त्यामुळे मुख्यमंत्री होण्याची माझी इच्छा नाही.”