लोकसत्ता वार्ताहर

लोणावळा : महाराष्ट्रातील जागृत देवस्थान असलेल्या कार्ला गडावरील एकवीरा देवीच्या नवरात्र उत्सवाला रविवारी सुरुवात झाली. खंडाळ्यातील वाघजाई देवी, नांगरगावातील नांगराई देवी येथे घटस्थापना करण्यात आली.

नवरात्रोत्सवाच्या पहिल्याच दिवशी भाविक मोठ्या प्रमाणात गडावर आल्याने देवीचा गड आणि मंदिर गाभाऱ्याचा परिसर येथे सकाळपासून गर्दी झाली होती. मंदिर गाभारा परिसरात गर्दीचे नियोजन करण्यामध्ये प्रशासकीय समितीला अपयश आल्याने प्रचंड गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते. काही काळानंतर पोलीस कर्मचारी येथे दाखल झाल्यानंतर गर्दीवर नियंत्रण आणण्यात आले.

आणखी वाचा-नवरात्रोत्सवानिमित्त शहरातील प्रमुख मंदिरांच्या परिसरातील वाहतूक व्यवस्थेत बदल

मावळचे तहसीलदार विक्रम देशमुख आणि प्रांत अधिकारी संजय नवले यांच्या हस्ते पहाटे देवीचा अभिषेक आणि आरती पार पडली. यानंतर गुरव प्रतिनिधी, पुजारी यांच्या हस्ते देवीची घटस्थापना करण्यात आली. उच्च न्यायालयाने श्री एकवीरा देवस्थान ट्रस्टचा कारभार नवनियुक्त विश्वस्त यांच्याकडे देण्याचे आदेश दिलेले असतानाही अद्याप येथील कारभार प्रशासक पहात आहेत. त्यामुळे विश्वस्त मंडळाने नाराजी व्यक्त केली. भाविकांची गर्दी झालेली असताना ती नियंत्रणात राखण्यासाठी गडावर कोणतीच शासकीय यंत्रणा उपलब्ध नव्हती. तहसीलदार यांनी देखील गडावरून काढता पाय घेतल्याने भाविकांना सुलभतेने दर्शन मिळणार कसे असा प्रश्न नवनिर्वाचित विश्वस्त व माजी उपाध्यक्ष मारुती देशमुख यांनी उपस्थित केला.

आणखी वाचा-हलगीचा कडकडाट, संबळाचा निनाद! आई राजा उदो-उदोच्या जयकारात घटस्थापना

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

नवरात्र उत्सवाची गडावर जय्यत तयारी भाविक भक्तांनी केली असून मंदिराच्या आतील परिसर आणि मंदिराचा बाहेरील परिसर फुलांनी सजविण्यात आला होता. दर्शन रांगेत उभ्या राहणाऱ्या भाविकांसाठी तात्पुरती शेडची व्यवस्था करण्यात आली होती. मात्र, दर्शनाचे नियोजन प्रशासकीय समितीकडून योग्य प्रकारे न झाल्याने पहिल्याच माळेला गोंधळ पाहायला मिळाला. पुढील आठही दिवस एकवीरा देवीच्या दर्शनासाठी भाविकांची अशीच गर्दी कायम राहणार असल्याने प्रशासकीय समितीने बोध घेत पुढील आठ दिवस नियोजन करून दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना सुलभतेने दर्शन कसे होईल याकरिता सतर्क राहणे गरजेचे आहे. कार्ला मंदिरासह खंडाळा, नांगरगाव, तुंगार्ली, वलवण, गावठाण, भांगरवाडी, वरसोली, ओळकाईवाडी या भागांमध्ये देवीची घटस्थापना करण्यात आली.