पुणे : श्री महालक्ष्मी मंदिर, सारसबाग सार्वजनिक नवरात्र उत्सवात विजयादशमीच्या (दसरा) शुभ मुहूर्तावर देवीला १६ किलो सोन्याची साडी परिधान करण्याची परंपरा यंदाही कायम राहिली. ही सोन्याची साडी खास दक्षिण भारतातील कारागिरांनी सहा महिन्यांच्या अथक परिश्रमाने साकारली आहे.
श्री महालक्ष्मी मंदिर, सारसबाग, श्री बन्सीलाल रामनाथ अग्रवाल धार्मिक व सांस्कृतिक ट्रस्टतर्फे ही सोन्याची साडी वर्षातून दोनदा, म्हणजेच दसरा आणि लक्ष्मीपूजनाच्या दिवशी, देवीला नेसविण्यात येते. दसऱ्याला सोने लुटण्याची परंपरा असल्यामुळे देवीचे सोन्याच्या साडीतील दर्शन भाविकांना व्हावे, हा त्यामागचा मुख्य उद्देश असतो. एका भक्ताने देवीला ही १६ किलो वजनाची आणि आकर्षक नक्षीकाम केलेली साडी अर्पण केली आहे.
रावणदहन आणि स्त्री सबलीकरणाचा संदेश
या उत्सवाचे मुख्य आकर्षण म्हणजे विजयादशमीला होणारे प्रतिकात्मक रावणदहन होय. मंदिरासमोर रात्री ९ वाजता २५ फूट उंच रावणाच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन करण्यात येणार आहे. विविध सामाजिक समस्यांचे प्रतीक असलेल्या या रावणाचे दहन करून समाजात स्त्री सबलीकरणाचा संदेश देण्यात येणार आहे.
मंदिराचे विश्वस्त अँड प्रताप परदेशी यांनी ही माहिती दिली असून, पुणेकरांनी या कार्यक्रमास मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन त्यांनी केले आहे. मंदिराचे संस्थापक विश्वस्त राजकुमार अग्रवाल, प्रमुख विश्वस्त अमिता अग्रवाल यांच्यासह इतर विश्वस्तांनी या उत्सवाचे आयोजन केले आहे.