पुण्यातील बहुचर्चित नयना पुजारी खूनप्रकरणातील दोषींना न्यायालयाकडून फाशीची शिक्षा सुनावण्यात आली आहे. पुणे जिल्हा सत्र न्यायालयाने तिन्ही दोषींना फाशीची शिक्षा सुनावली आहे. योगेश राऊत, महेश ठाकूर, विश्वास कदम या तिन्ही दोषींना न्यायालयाने फाशीची शिक्षा ठोठावली आहे. तर राजेश चौधरीला हा या प्रकरणातील माफीचा साक्षीदार होता. आठ वर्षांपूर्वी नयना पुजारी यांच्यासोबत घडलेली बलात्काराची घटना ‘दुर्मिळातील दुर्मिळ’ असल्याचे निकाल सुनावताना न्यायाधीशांनी म्हटले.
दरम्यान, आज शिक्षा सुनावण्यापूर्वी दोषींना न्यायालयासमोर स्वत:ची बाजू मांडण्याची अखेरची संधी देण्यात आली. यावेळी योगेश राऊत याने आपण हा गुन्हा केला नसल्याचा दावा केला. न्यायालयात आणताना आणि नेताना पोलिसांकडून आपल्यावर दबाव आणला जातो. मला या गुन्ह्यात गोवण्यात आले आहे, असे त्याने म्हटले. तसेच राजेश चौधरी हादेखील गुन्ह्यात सहभागी होता. त्यामुळे त्यालाही शिक्षा करण्यात यावी, असे राऊतने म्हटले. मात्र, न्यायालयाने त्याची ही मागणी फेटाळून लावली. माझ्या आईचा, लहान मुलीचा आणि पत्नीचा विचार करून शिक्षा कमी करावी, अशी विनंतीही योगेश राऊत याने केली. तर महेश ठाकूर याने न्यायालयासमोर काहीही बोलण्यास नकार दिला. या प्रकरणातील तिसरा दोषी विश्वास कदम यानेही न्यायालयासमोर आपली बाजू मांडताना माफीचा साक्षीदार झालेल्या राजेश चौधरीने हा गुन्हा केल्याचा दावा त्याने केला. त्यामुळे राजेश चौधरीलाही शिक्षा देण्याची मागणी विश्वास कदमने केली.
तर सरकारी पक्षाचे वकील हर्षद निंबाळकर यांनी दिल्लीतील निर्भया प्रकरणाचा दाखला देत तिन्ही आरोपींना फाशीची शिक्षा द्यावी, अशी मागणी न्यायालयाकडे केली होती. अॅड. निंबाळकर यांनी या खटल्यातील क्रौर्याकडे न्यायालयाचे लक्ष वेधले. तिन्ही नराधामांना फाशीची शिक्षा देण्याची मागणी करताना वकील निंबाळकर यांनी यापूर्वी घडलेल्या अनेक प्रकरणांचे आणि त्यामध्ये न्यायालयाने सुनावलेल्या फाशीच्या शिक्षेचे दाखले दिले. आरोपींनी अत्यंत थंड डोक्याने हे घृणास्पद कृत्य केल्याचेही त्यांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले. तर बचावपक्षाच्या वकिलांनी माफीचा साक्षीदार राजेश चौधरी याला सहआरोपी करण्याची मागणी केली आहे.
गेली सात वर्ष नयना पुजारी खून खटल्याची सुनावणी सुरु होती. सरकार पक्षाकडून ३७ साक्षीदारांच्या साक्षी नोंदवण्यात आल्या होत्या. विशेष सरकारी वकील अॅड. हर्षद निंबाळकर यांनी सरकार पक्षाकडून बाजू मांडली. त्यांना अॅड. सत्यम निंबाळकर, अॅड. हृषीकेश कांबळे यांनी साहाय्य केले. बचाव पक्षाकडून अॅड. बी. ए. अलुर, अॅड. रणजित ढोमसे-पाटील, अॅड. अंकुशराजे जाधव यांनी तेरा साक्षीदारांच्या साक्षी नोंदविल्या. दोन्ही बाजूचा युक्तिवाद पूर्ण झाल्यानंतर विशेष न्यायाधीश एल. एल. येनकर यांच्या न्यायालयात सोमवारी सकाळी आरोपी राऊत, ठाकूर, कदम यांना सकाळी अकराच्या सुमारास हजर करण्याचे आदेश देण्यात आले होते. मात्र, कारागृह प्रशासन आणि पोलिसांकडून आरोपींना हजर करण्यास सुमारे तासभर विलंब झाल्याने न्यायालयाने कारागृह प्रशासनाला नोटीस बजावली होती. त्यामुळे आज दोषींना खटल्याच्या तासभर आधीच न्यायालयात आणण्यात आले.
संगणक अभियंता नयना अभिजीत पुजारी (वय २८, रा. अशोकाआगम, दत्तनगर, कात्रज) या ८ ऑक्टोबर २००९ रोजी कामावरून घरी निघाल्या होत्या. त्यावेळी हडपसर येथे सोडण्याचा बहाणा करून मोटारचालक आणि त्याच्या साथीदारांनी त्यांचे अपहरण केले. त्यानंतर नयना पुजारी यांच्यावर सामूहिक बलात्कार करून त्यांचा खून करण्यात आला होता. त्यांचा मृतदेह खेड तालुक्यातील जरेवाडी फाटा येथे टाकून देण्यात आला होता. ही घटना उघडकीस आल्यानंतर शहरात खळबळ उडाली होती.
पोलिसांकडून या गुन्ह्य़ाचा तपास करून आरोपी योगेश अशोक राऊत (वय २४), राजेश पांडुरंग चौधरी (वय २३, दोघे रा. गोळेगाव, ता. खेड, जि. पुणे) महेश बाळासाहेब ठाकूर (वय २४, रा. सोळू, ता. खेड, जि. पुणे), विश्वास हिंदूराव कदम (वय २६, रा. दिघी, आळंदी रस्ता, मूळ रा. भुरकवाडी, ता. खटाव, जि. सातारा) यांना अटक करण्यात आली होती.
या खटल्याची सुनावणी सुरू झाल्यानंतर आरोपी योगेश राऊत हा ससून रुग्णालयातून पसार झाला होता. गुन्हे शाखेच्या दरोडा प्रतिबंधक पथकाचे पोलीस निरीक्षक सतीश गोवेकर, पोलीस नाईक संतोष जगताप यांच्या पथकाने त्याला शिर्डी येथे पकडले होते. दरम्यान, राऊत याला पसार झाल्याप्रकरणी न्यायालयाकडून शिक्षा सुनावण्यात आली आहे. या खटल्यात आरोपी राजेश चौधरी याने माफीचा साक्षीदार होण्याची तयारी दर्शवली होती. त्याचा प्रथमवर्ग न्यायदंडाधिकाऱ्यांकडे जबाब नोंदविण्यात आला होता. बचाव पक्षाकडून चौधरी याला माफीचा साक्षीदार करण्यास उच्च न्यायालयात हरकत घेण्यात आली होती. उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर चौधरी याला माफीचा साक्षीदार करण्यात आले होते.