शरीरात शिरलेला विषाणू आणि शरीराची रोगप्रतिकारक शक्ती या दोहोंची एकमेकात जुंपलेली असताना घडणाऱ्या रेणवीय प्रक्रियांबाबत ‘एनसीसीएस’च्या (नॅशनल सेंटर फॉर सेल सायन्स) संशोधकांनी केलेल्या संशोधनाला ‘पीएनएएस’ (प्रोसिडिंग्ज ऑफ द नॅशनल अकॅडमी ऑफ सायन्सेस ऑफ द युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका) या आंतरराष्ट्रीय संशोधन नियतकालिकात स्थान मिळाले आहे. एकाच वेळी विविध विषाणूंविरोधात काम करू शकणाऱ्या औषधांच्या निर्मितीसाठी हे संशोधन उपयोगी पडू शकणार आहे.
एनसीसीएसमधील वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. अरविंद साहू यांनी पत्रकार परिषदेत संशोधनाविषयी माहिती दिली. विशिष्ट सूक्ष्मजीव किंवा विषाणू शरीराची रोगप्रतिकारक शक्ती भेदून शरीरात कसा राहू शकतो आणि रोग कसा निर्माण करू शकतो, हे समजून घेणे या संशोधनाचे प्रमुख उद्दिष्ट होते. विषाणूने रोगप्रतिकारक शक्ती निष्प्रभ करण्यात यश मिळवण्याच्या प्रवासातील काही महत्त्वाच्या रेणवीय प्रक्रिया शोधण्यात डॉ. साहू आणि त्यांच्या चमूला यश मिळाले आहे.
विषाणू शरीरात शिरल्याचे कळल्यानंतर रोगप्रतिकारक शक्तीचाच एक भाग असलेली प्रतिसाद यंत्रणा (कॉम्प्लिमेंट सिस्टिम) कामाला लागते आणि रेणवीय प्रक्रियांची साखळी निर्माण करून सूक्ष्मजीवाला निष्प्रभ करू पाहते. या प्रतिसाद यंत्रणेला नियंत्रित करण्यासाठी शरीराकडून विशिष्ट प्रकारची प्रथिने तयार केली जातात. या प्रथिनांना ‘आरसीए’ प्रथिने (रेग्युलेटर्स ऑफ कॉम्प्लिमेंट अॅक्टिव्हेशन) म्हणतात. विषाणू आणि प्रतिसाद यंत्रणेची लढाई सुरू असताना विषाणूसुद्धा आरसीए प्रथिनांसारखीच हुबेहूब प्रथिने तयार करतो आणि ही प्रथिने शरीराने तयार केलेल्या काही आरसीए प्रथिनांचे नुकसान करून प्रतिसाद यंत्रणेचे काम थांबवतात. हे सर्व घडत असताना होणारी रेणवीय प्रक्रिया (मॉलेक्युलर मेकॅनिझम) आतापर्यंत स्पष्ट झाली नव्हती. ती डॉ. साहू व चमूने शोधली आहे.
जसा विषाणू शरीराने तयार केलेल्या आरसीए प्रथिनांची नक्कल करून त्यांना निष्प्रभ करतो, तीच प्रक्रिया विषाणूने तयार केलेल्या आरसीए प्रथिनांबद्दलही शरीराकडून करता येऊ शकेल, हे संशोधकांनी सिद्ध केले. विविध प्रकारचे विषाणू थोडय़ा फार फरकाने समानच प्रथिने तयार करत असल्यामुळे हे संशोधन वेगवेगळ्या विषाणूंच्या विरोधातील औषध तयार करण्यासाठी उपयोगी पडू शकेल. डॉ. साहू यांच्याबरोबर अवनीश कुमार गौतम, योगेश पानसे, पायल घोष, मलिक जोहिद रझा, जयती मुळिक यांचाही संशोधनात सहभाग आहे.