पुणे : रस्त्यावर उतरून नागरिकांचे प्रश्न सोडविण्याचा संकल्प राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाने शनिवारी आयोजित पक्षाच्या शहर कार्यकारिणीच्या बैठकीत सोडला. आगामी महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पक्ष पदाधिकाऱ्यांनी लोकांची कामे करण्यासाठी सक्रिय होण्याच्या सूचनाही केल्या गेल्या.

मॉडर्न महाविद्यालयाच्या सभागृहात ही बैठक झाली. पक्षाचे कार्याध्यक्ष प्रदीप देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीसाठी आमदार चेतन तुपे, माजी आमदार सुनील टिंगरे, माजी महापौर दत्ता धनकवडे, राजलक्ष्मी भोसले यांच्यासह बाबुराव चांदेरे, सुभाष जगताप, दत्ता सागरे तसेच इतर पदाधिकारी आणि माजी नगरसेवक उपस्थित होते. राज्यात सत्ताधारी म्हणून राष्ट्रवादी पक्ष काम करत असला, तरी नागरिकांचे प्रश्न सोडविण्यासाठी प्रशासनाची वाट न पाहता, थेट रस्त्यावर उतरून लोकांचे प्रश्न सोडविण्याचा निर्धार या वेळी करण्यात आला.

सर्वोच्च न्यायालयाने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका चार महिन्यांत घेण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे सुमारे सव्वातीन वर्षे रखडलेल्या महापालिकांच्या निवडणुका पुढील काही महिन्यांत होण्याची शक्यता आहे. राज्यात सत्ताधारी असलेला भाजप, तसेच शिवसेना (शिंदे गट) या पक्षांचे पदाधिकारी कामाला लागले आहेत. स्थानिक पातळीवरील परिस्थिती पाहून निवडणुका महायुतीत लढायच्या की स्वबळावर याचा निर्णय घेतला जाईल, असे संकेत यापूर्वीच भाजपच्या नेत्यांनी दिले आहेत. या पार्श्वभूमीवर, राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाच्या शनिवारच्या बैठकीत चर्चा झाली. त्यामध्ये पक्षाची सदस्य नोंदणी वाढवितानाच प्रत्येक कार्यकर्त्याने थेट जनतेत जाऊन काम केले पाहिजे, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

यंदाचे अधिवेशन भव्य

राष्ट्रवादी काँग्रेसच्या वर्धापनदिनानिमित्त १० जूनला होणारे यंदाचे अधिवेशन ‘न भूतो न भविष्यति’ असे झाले पाहिजे. यासाठी प्रत्येक सदस्याने प्रयत्नशील राहावे. बालेवाडी येथे पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली हे अधिवेशन होणार आहे. यासाठीचे नियोजन कार्यकारिणीच्या बैठकीत करण्यात आल्याचे कार्याध्यक्ष प्रदीप देशमुख यांनी सांगितले.