शरद पवार यांचे महापालिका निवडणुकीबाबत सूचक भाष्य
ऐतिहासिक वारसा लाभलेले पुणे आता काळानुरूप बदलत आहे. शहराच्या विविध भागांमध्ये पाच वर्षांत नगरसेवकांनी विकासकामे करून पुण्याचा चेहरा बदलण्यामध्ये योगदान दिले आहे. या कामाची नोंद ठेवून पुणेकर योग्य वेळी पावती देतील, अशा शब्दांत माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी रविवारी आगामी महापालिका निवडणुकीबाबत सूचक भाष्य केले.
पुणे महापालिकेतर्फे शनिवारवाडा येथील ध्वनी- प्रकाश योजनेच्या नूतनीकरणाचे उद्घाटन आणि शनिवारवाडय़ाची माहिती देणाऱ्या चित्ररूप पुस्तिकेच्या (कॉफी टेबल बुक) मराठी आवृत्तीचे प्रकाशन पवार यांच्या हस्ते झाले. महापौर प्रशांत जगताप, खासदार वंदना चव्हाण, आमदार अनिल भोसले, उपमहापौर मुकारी अलगुडे, स्थायी समिती अध्यक्ष बाळासाहेब बोडके, सभागृहनेता शंकर केमसे, इतिहास संशोधक पांडुरंग बलकवडे, काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस अभय छाजेड या वेळी उपस्थित होते.
पुनवडी, पूना ते पुणे हा शहराचा आणि जुन्या वास्तूंचा इतिहास नव्या पिढीसमोर नेण्याचा महापालिकेचा प्रयत्न स्तुत्य असल्याचे सांगून पवार म्हणाले,‘‘ इतिहासाचा अभिमान जरूर ठेवावा आणि वारसा जतन करावा. पण, इतिहासातील सगळ्याच गोष्टी स्वीकारायच्या असतात असे नाही. एका चित्रपटामुळे शनिवारवाडा आणि बाजीराव पेशव्यांचे कर्तृत्व केवळ अन्य भाषकांपर्यंतच नाही, तर जगभरात पोहोचले. छत्रपती शिवाजी महाराजांचे, पेशव्यांचे, स्वातंत्र्यपूर्व काळात ‘स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे’ असे ठणकावून सांगणाऱ्या लोकमान्य टिळकांचे, समतेचा विचार मांडून शिक्षण प्रसाराचे कार्य करणाऱ्या महात्मा फुले यांचे पुणे आता बदलत आहे. ज्ञानसंपादनाचे महत्त्वाचे केंद्र म्हणून पुण्याकडे पाहिले जात आहे. ऑटोमोबाईल, माहिती तंत्रज्ञान क्षेत्रामध्ये पुणे अग्रस्थानी आहे.’’
‘‘पुण्याचा, महाराष्ट्राचा, मराठय़ांचा आणि पेशव्यांचा इतिहास या पुस्तिकेच्या माध्यमातून मराठी जनांसमोर ठेवण्याची खबरदारी महापालिकेने घेतली आहे. ही पुस्तिका पर्यटकांच्या आकर्षणाचे केंद्र ठरेल. मात्र, ध्वनी-प्रकाश योजना नेमकी कशी झाली हे पाहिले नसल्यामुळे त्याविषयी काही भाष्य करणे योग्य होणार नाही, असेही पवार यांनी सांगितले. शहराच्या विकासामध्ये नगरसेवकांनी दिलेल्या योगदानाची नोंद ठेवून पुणेकर योग्य वेळी पावती देतील,’’ असा विश्वासही पवार यांनी व्यक्त केला. वंदना चव्हाण यांनी मनोगत व्यक्त केले. प्रशांत जगताप यांनी प्रास्ताविक केले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ncp councillors have contributed important role in pune development say sharad pawar
First published on: 06-06-2016 at 02:05 IST