पिंपरी पालिकेतील गटनेतेपदाचा वाद

पिंपरी पालिकेत राष्ट्रवादी काँग्रेसच्या गटनेतेपदी माजी महापौर योगेश बहल यांची नियुक्ती करण्यावरून निर्माण झालेला वाद अजूनही शमण्याची चिन्हे नाहीत. ज्यांनी पक्षाचे वाटोळे केले, त्यांच्याच हाती पुन्हा कारभार देऊ नका, अशी भूमिका राष्ट्रवादीच्या काही नगरसेवकांनी घेतली आहे. या संदर्भात, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत बैठकीत चर्चा सुरू असतानाच बहल यांना गटनेता केल्यास आपण पक्षाच्या नगरसेवकपदाचा राजीनामा देऊ, असा थेट इशारा नगरसेवक दत्ता साने यांनी दिला आहे.

पिंपरी पालिकेत राष्ट्रवादीचे संख्याबळ दुसऱ्या क्रमांकाचे आहे. त्यामुळे विरोधी पक्षनेतेपद राष्ट्रवादीकडे राहणार आहे. पक्षाचा गटनेता कोण असेल, अशी उत्सुकता राष्ट्रवादी वर्तुळात होती. बहल, साने यांच्यासह अजित गव्हाणे, राजू मिसाळ अशी बरीच नावे चर्चेत होती. अजित पवारांनी पालिका कामकाजातील दीर्घ अनुभव लक्षात घेऊन बहल यांची निवड केली. त्यांच्या नावाची घोषणा होताच पक्षात नाराजीचा तीव्र सूर उमटला. बहल सोडून कोणालाही गटनेता करा, अशी मागणी राष्ट्रवादीच्या नगरसेवकांनी सुरू केली. आतापर्यंतचा कारभार त्यांच्याकडेच होता. त्यांच्या मनमानी व चुकीच्या कार्यपद्धतीमुळेच राष्ट्रवादीचा पालिका निवडणुकीत दारुण पराभव झाला, असा या नगरसेवकांचा सूर आहे. या संदर्भात, नगरसेवक साने यांनी अतिशय आक्रमक भूमिका घेतली असून त्यांच्या पुढाकाराने झालेल्या नगरसेवकांच्या बैठकीत २२ नगरसेवकांनी हजेरी लावली होती. बहल नको, या भूमिकेला सर्वानीच पाठिंबा दिला. स्थानिक नेत्यांनी अजित पवारांना ही माहिती दिली. त्यानंतर, या नगरसेवकांनीही पवारांची भेट घेतली. मात्र, बहल यांनाच कायम ठेवण्याची त्यांची भूमिका आहे.

या विषयावरून पक्षात धुसफूस असतानाच सोमवारी पुन्हा राष्ट्रवादीच्या नगरसेवकांनी अजित पवारांची पुण्यात भेट घेतली. यावेळी आधी नियुक्ती जाहीर केल्यानंतर पुन्हा नाव मागे घेतल्यास चुकीचा संदेश जाईल, असे मत अजित पवारांनी मांडले. बहल अनुभवी असल्याने त्यांना पद दिल्यास फायदाच होईल, असे पवार नगरसेवकांना सांगत आहेत. साने यांचा मात्र कोणत्याही परिस्थितीत बहल यांच्याकडे पक्षाची सूत्रे देण्यास विरोध आहे. अजित पवारांनी जर निर्णय बदलला नाही तर पक्षाचा राजीनामा देऊ, असे त्यांनी बैठकीत निक्षून सांगितले व ते बैठकीतून निघून गेले.