पुणे : जीवनावश्यक वस्तूंवर लावण्यात आलेला वस्तू आणि सेवाकर (जीएसटी) आणि वाढत्या महागाईच्या निषेधार्थ राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने महागाईची दहीहंडी फोडण्यात आली.

राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांच्या नेतृत्वाखाली शिवाजीनगर परिसरातील राष्ट्रवादी काँग्रेस भवन येथे निषेध आंदोलन करण्यात आले. युवक अध्यक्ष किशोर कांबळे, माजी नगरसेवक महेंद्र पठारे, सदानंद शेट्टी, कार्याध्यक्ष मनोज पाचपुते, अजिंक्य पालकर, प्रदेश सरचिटणीस महेश हांडे, वेणू शिंदे, दीपक कामठे, भूषण बधे यांच्यासह अन्य कार्यकर्ते आणि पदाधिकारी यावेळी उपस्थित होते. प्रशांत जगताप म्हणाले की, एकीकडे हिंदुत्वाचा मुद्दा पुढे करून मते मिळवायची आणि हिंदूंना त्यांचा कुठलाही सण साजरा करता येणार नाही इतकी महागाई वाढवून ठेवायची, ही मोदी सरकारची नीती आहे. देशावर दीडशे वर्षे राज्य करणाऱ्या इंग्रजांनीही कधी दूध आणि दह्यावर कर लावला नाही; परंतु सत्तेच्या धुंदीत असणाऱ्या मोदी सरकारने अगदी दूध दह्यावर जीएसटी लावला आहे. बेरोजगारी, महागाई, इंधन दरवाढ असे अनेक मुद्दे असताना नागरिकांना दिलासा देण्यासाठी मोदी सरकारकडे पैसे नाहीत; परंतु विरोधी पक्ष सत्ता असणारी राज्य सरकारने पाडणे, तेथील आमदारांना विकत घेणे यासाठी केंद्राकडे पैसा आहे.