पुणे: राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाचे शहराध्यक्ष दीपक मानकर यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाल्यानंतर त्यांनी तातडीने पदाचा राजीनामा दिल्याने आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्षात नवीन शहराध्यक्षासाठी हालचाली सुरू झाल्या आहेत. मानकर यांच्या राजीनाम्यानंतर या पदासाठी कोणीही उघडपणे तयारी दर्शविली नसताना आमदार चेतन तुपे किंवा माजी आमदार सुनील टिंगरे यांच्याकडे जबाबदारी द्यावी, की कार्याध्यक्ष प्रदीप देशमुख यांच्याकडे प्रभारी अध्यक्षपदाची धुरा सोपवावी, या विवंचनेत उपमुख्यमंत्री अजित पवार यांची ‘राष्ट्रवादी’ पडली आहे.

मानकर यांच्या राजीनाम्याबाबत अद्याप उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कोणताही निर्णय घेतलेला नाही. त्यांच्या राजीनाम्यानंतर पक्षाकडून शहराध्यक्षपदासाठी कोणीही उघडपणे तयारी दर्शविलेली नाही. पण, शहराध्यक्षपदासाठी अजित पवार यांच्या ‘राष्ट्रवादी’ची चाचपणी सुरू झाली आहे. या पक्षाचे पुणे शहरातील एकमेव आमदार चेतन तुपे यांच्याकडे शहराध्यक्षपदाची धुरा देण्यात यावी, असे पक्षातील काही पदाधिकाऱ्यांनी सुचविले आहे. वडगाव शेरी विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार सुनील टिंगरे यांच्याही नावाची चर्चा आहे. मात्र, कल्याणीनगर येथील पोर्शे अपघात प्रकरण आणि त्यानंतर विधानसभा निवडणुकीत पत्करावा लागलेला पराभव या पार्श्वभूमीवर त्यांच्याकडे या पदाची जबाबदारी देण्याबाबत पक्षाच्या पदाधिकाऱ्यांमध्ये ‘साधकबाधक’ चर्चा करण्यात आल्याचे पक्षातील सूत्रांकडून सांगण्यात आले.

तुपे आणि टिंगरे यांच्याशिवाय पक्षाचे कार्याध्यक्ष प्रदीप देशमुख यांच्याकडे प्रभारी शहराध्यक्षपद सांभाळण्याची जबाबदारी देण्याबाबतही पदाधिकाऱ्यांनी विचारविनिमय केला आहे. त्यामुळे ‘राष्ट्रवादी’त शहराध्यक्षपदाबाबत त्रांगडे झाल्याचे दिसून येते. अजित पवार यांच्या ‘राष्ट्रवादी’ची पुणे शहराच्या उपनगरी भागात ताकद आहे. आगामी महापालिका निवडणूक स्वबळावर लढण्याच्या दृष्टीने या पक्षाने चाचपणी सुरू केली आहे. तसेच, महायुती म्हणून महापालिकेच्या निवडणुका लढल्यास त्या दृष्टीनेही प्रभागांची चाचपणी सुरू करण्यात आली आहे.

सध्या राष्ट्रवादी काँग्रेस महिला आघाडी, युवक, विद्यार्थी संघटनांचे १५०० पदाधिकारी आहेत. एक लाख सभासद नोंदविण्याच्या प्रक्रियेचेही नियोजन करण्यात आले आहे. त्या दृष्टीने पदाधिकाऱ्यांना सभासद नोंदणी पुस्तिकांचे वाटप झाले आहे. अशा परिस्थितीत मानकर यांनी शहराध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर नवीन शहराध्यक्ष नियुक्त करण्यासाठी हालचाली सुरू झाल्या आहेत.

कोटनवीन शहराध्यक्ष नियुक्तीबाबतचा निर्णय पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष, उपमुख्यमंत्री अजित पवार घेतील. पुणे जिल्हा हा अजित पवार यांचे प्राबल्य असलेला आहे. ते जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत. आगामी महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर लवकरच नवीन शहराध्यक्षपदाचा निर्णय घेतला जाईल.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

– प्रदीप देशमुख,कार्याध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार), पुणे