पुणे महापालिकेच्या अर्थसंकल्पातील तरतुदींमध्ये दुजाभाव झाल्याच्या आरोपावरून न्यायालयात धाव घेतलेल्या पुण्यातील नगरसवेकांची माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मंगळवारी भेट घेतली. यावेळी त्यांनी १५ वर्षांच्या सत्ता उपभोगताना अर्थसंकल्पातील तरतुदींमध्ये आम्ही कधीही भेदभाव केला नसल्याचे सांगितले.

पवार म्हणाले की, पुणे महापालिकेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची १५ वर्षे सत्ता असताना अर्थसंकल्पात तरतुदी करताना राष्ट्रवादीचा नगरसेवक म्हणून त्याला अधिक आणि इतर पक्षातील नगरसेवकांसाठी कमी तरतूद अशा प्रकारचा भेदभाव आम्ही कधी केला नाही. सर्वांना नेहमी न्याय देण्याचा प्रयत्न केला. पक्षातील नगरसेवकांनी दाखल केलेल्या याचिकेवर महापालिकेतील सत्ताधारी पक्षाकडून नाराजी व्यक्त करण्यात आली आहे. याचिका मागे घेण्याबाबतच्या प्रश्नावर पवार म्हणाले की, या याचिकेबाबत अद्याप पुण्याचे पालकमंत्री किंवा स्थायी समिती अध्यक्षांनी माझ्याशी चर्चा केलेली नाही. त्यांनी चर्चा केल्यास पुढील निर्णय घेतला जाईल.

पुणे महानगरपालिकेचे २०१७-१८ या वर्षाचे पाच हजार ९१२ कोटींचे अंदाजपत्रक स्थायी समिती अध्यक्ष मुरलीधर मोहळ यांनी सभागृहात मांडले. या अंदाजपत्रकावर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नगरसेवक योगेश ससाणे, भैयासाहेब जाधव आणि महेंद्र पठारे यांनी तरतुदीत असमानता असल्यावरून न्यायलयात याचिका दाखल केली. त्यावर सोमवारी न्यायलयाने पुणे महापालिकेला लेखी उत्तर देण्यास सांगितले.

अजित पवार यांनी यावेळी संघर्ष यात्रेवरही भाष्य केले. ते म्हणाले की, राज्यात शेतकऱ्यांच्या प्रश्नावर संघर्षयात्रा काढण्यात येत आहे. या ठिकाणी जाऊन बोलणे मला गरजेचे वाटते. पक्षातील इतर कोणी नेते त्या ठिकाणी नसेल तरी चालते, पण त्या व्यासपीठावर मी शेतकऱ्यांना पाहिजे असतो. शेतकऱ्यांच्या प्रश्नावर शेवटपर्यंत आम्ही लढा देत राहणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.