राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांच्यावर एका महिलेनं विनयभंगाचा गुन्हा दाखल केला आहे. हा गुन्हा दाखल झाल्यानंतर राजकीय वर्तुळात प्रतिक्रिया उमटत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी जितेंद्र आव्हाडांच्या समर्थनार्थ प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी शिंदे गटाचे नेते अब्दुल सत्तार यांचं नाव न घेता सरकारवर निशाणा साधला आहे. जेव्हा एखाद्या महिलेला शिवीगाळ होते, तेव्हा तो विनयभंग नसतो का? अशी प्रतिक्रिया सुप्रिया सुळेंनी दिली आहे. त्या पुणे येथे पत्रकार परिषदेत बोलत होत्या.

यावेळी सुप्रिया सुळे म्हणाल्या की, गर्दीच्या ठिकाणी मुख्यमंत्री होते, तेथे पोलीस यंत्रणा होती, ही सर्व घटना कॅमेऱ्यात कैद झाली आहे. यामध्ये जितेंद्र आव्हाड संबंधित महिलेस म्हणत आहेत की, ‘तू एवढ्या गर्दीत कशाला आली आहेस’ याला महाराष्ट्रात विनयभंग म्हणतात का? हे गलिच्छ राजकारण सुरू आहे, असं मी म्हणेन. हे थांबवण्याची जबाबदारी आमच्यावर नाही, त्यांच्यावर (सरकार) आहे. कारण ते सातत्याने दुखावले जात आहेत, आमचा कोणताही आमदार बंदूक घेऊन पोलीस ठाण्यात गेला नाही, त्यांच्यावर कोणतीही कारवाई का झाली नाही? एकावरही कारवाई झाली नाही.

हेही वाचा- “तू इथं काय करतेस असं म्हणत त्यांनी हाताने जोरात…”, जितेंद्र आव्हाडांवर विनयभंगाचा आरोप करणाऱ्या महिलेचे गंभीर आरोप

अब्दुल सत्तारांचा उल्लेख न करता सुप्रिया सुळे पुढे म्हणाल्या की, कुणी शिवीगाळ करतंय. महिलेला शिवीगाळ करणं विनयभंग नसतो का? हा एका महिलेचा अपमान आहे. पण याविरोधात मी एक शब्दही बोलले नाही. आजपर्यंत बोलले नाही आणि येथून पुढेही बोलणार नाही, हे सगळे गुन्हे आहेत. महिलांना शिवीगाळ करणं हा गुन्हा आहे. पोलीस ठाण्यात बंदूक घेऊन जाणं, हाही गुन्हा आहे. हा मोठा गुन्हा आहे. मंत्रालयातील पोलिसांना शिवीगाळ करणं, हा आपल्या देशात गुन्हा मानला जातो. तुम्ही मुख्यमंत्र्यांच्या सेक्रेटरीला शिव्या घालता, हे चालतं का? हा गुन्हा नाही का? असे सवालही सुळेंनी विचारले आहेत.

हेही वाचा- विनयभंगाचा आरोप करणाऱ्या महिलेला आव्हाडांनी ‘बहीण’ म्हटलं? राष्ट्रवादीने थेट VIDEO च दाखवला

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

“तुमच्या आमदाराने काहीही केलं तर त्यांना ‘सौ खून माफ है’ आम्ही काही केलं नाही तर आमच्यावर गुन्हे दाखल करता. आम्हाला तुरुंगात टाकता. हा कुठला न्याय आहे? यासाठीच ईडी सरकार आलंय का? प्रलोभनं द्या किंवा दडपशाही करा, या दोन गोष्टींवरच हे सरकार सुरू आहे, असा टोलाही सुप्रिया सुळेंनी लगावला आहे.