राज्यात सध्या राज्यसभा निवडणुकीच्या अनुषंगाने राजकीय वातावरण तापलं आहे. सत्ताधारी आणि विरोधकांनी ही निवडणूक प्रतिष्ठेची केली होती. यासंदर्भात राजकीय दावे-प्रतिदावे होत असताना पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपामध्ये वेगळाच कलगीतुरा रंगताना दिसू लागला आहे. भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेसकडून खोचक शुभेच्छा देण्यात आल्या. राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या रुपाली ठोंबरे-पाटील यांनी चंद्रकांत पाटील यांना तेलाची बाटली, साबण, ब्रश आणि गोळा केलेला निधी कुरिअरने पाठवला आहे. तसेच, यासंदर्भात माध्यमांशी बोलताना चंद्रकांत पाटील यांना खोचक सल्ला देखील दिला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

“वास्तविक त्यांनी हिमालयात जायला पाहिजे, पण..”

चंद्रकांत पाटील यांनी निवडणुकांसंदर्भात केलेल्या वक्तव्याचा यावेळी रूपाली पाटील यांनी उल्लेख केला. “राज्यात कुठेही निवडणूक लावा. मी जर निवडून आलो नाही, तर हिमालयात जाईन, असं विधान भाजपाचे प्रदेशाध्यक्ष आणि कोथरूडचे आमदार चंद्रकात पाटील यांनी केलं होतं. मात्र कोल्हापूर येथील पोटनिवडणूक चंद्रकांत पाटील लढले नाहीत. पण तिथे भाजपाच्या उमेदवाराला पराभवाला सामोरे जावे लागले. त्यामुळे त्यांनी वास्तविक पाहता हिमालयात जायला पाहिजे होते. मात्र ते काही गेले नाहीत”, असं रुपाली पाटील म्हणाल्या.

“राजकीय संस्कृती संपवण्याचं काम”

दरम्यान, चंद्रकांत पाटील यांनी राजकीय संस्कृती संपवण्याचं काम केल्याची टीका रुपाली पाटील यांनी केली आहे. “त्याच दरम्यान चंद्रकांत पाटील यांनी चुलीत जा, मसणात जा, अशा पद्धतीचे विधान केले. त्यामुळे त्यांनी राजकीय संस्कृती संपविण्याचे काम केले आहे. त्या पार्श्वभूमीवर आज आम्ही चंद्रकांत पाटलांच्या वाढदिवशी हिमालयात जाण्यासाठी गोळा केलेला निधी आणि तेलाची बाटली, साबण, ब्रश, टूथपेस्ट कुरिअरने पाठवत आहोत”, असं रुपाली पाटील म्हणाल्या.

महाविकास आघाडीनं दोन मतं गमावली? नवाब मलिक, अनिल देशमुखांच्या याचिकेवर सुनावणीस कोर्टाचा नकार!

“चंद्रकांत पाटलांनी हिमालयात गेल्यावर डोक्याला तेल लावावे आणि ध्यान करावे. यामुळे त्यांच्या मनाला आणि डोक्याला निश्चित शांती मिळेल. तसेच त्यांच्या संस्कारामध्ये देखील वाढ होईल. त्यामुळे दिलेला शब्द चंद्रकांत पाटील यांनी पाळला पाहिजे आणि हिमालयात जायला पाहिजे”, अशा शब्दांत रुपाली पाटील यांनी चंद्रकांत पाटील यांना खोचक सल्ला दिला आहे.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ncp rupali patil mocks bjp chandrakant patil birthday himalaya visit svk pmw
First published on: 10-06-2022 at 18:18 IST