पुणे : एकीकडे महाराष्ट्राचे गृहमंत्री खंडणी, दरोडा, अपहरण, खून, गोळीबार असे गंभीर गुन्हे करणाऱ्या नीलेश घायवळ सारख्या गुन्हेगारांना लंडनला पळवून लावण्यासाठी कार्यरत आहेत, तर दुसरीकडे देशाचे गृहमंत्री सत्तेच्या बळावर सोनम वांगचुक यांच्यासारख्या समर्पित देशभक्त व मॅगसेसे पुरस्काराने देशाचे नाव उज्वल करणाऱ्या व्यक्तिमत्त्वास राष्ट्रीय सुरक्षा कायद्यासारख्या कठोर कायद्यांतर्गत तुरुंगात डांबत आहेत. असा आरोप करत भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांच्या विरोधात पुण्यात मंगळवारी जोरदार आंदोलन करण्यात आले.
केंद्रात आणि राज्यात सत्ताधारी असलेल्या भाजपच्या या अराजकतेच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन झाले. केंद्रीय गृहमंत्री आणि भाजपचे नेते अमित शहा तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निषेधाचे फलक हाती घेऊन धिक्काराच्या घोषणा यावेळी देण्यात आल्या. जंगली महाराज रस्त्यावरील झाशीची राणी लक्ष्मीबाई चौकात हे आंदोलन झाले.
भाजप सरकारने तुरुंगात डामलेले सोनम वांगचुक हे देशाच्या सीमेवरील लडाख येथे अतिशय प्रतिकूल परिस्थितीत गरीब विद्यार्थ्यांना शिक्षण देण्याचे काम करतात. आपल्या कार्यातून मॅगसेसे पुरस्कारासह अनेक आंतरराष्ट्रीय सन्मान मिळवून त्यांनी भारत देशाचे नाव उज्ज्वल केले आहे. आपल्या ज्ञानाने बर्फाळ प्रदेशातील सैनिकांना उपयोगी ठरतील असे अत्याधुनिक पद्धतीचे तंबू तयार करून त्यांनी भारतीय सैन्याची फार मोठी मदत केली आहे. संशोधन क्षेत्रातील त्यांचे कार्य संपूर्ण विश्वात नावाजले गेले आहे.
गेल्या काही काळापासून त्यांनी भाजपच्या देशद्रोही कृत्यांची पोलखोल करण्यास सुरुवात केली. लडाखची हजारो एकर जमीन चीनने गिळंकृत केल्याची बाब त्यांनी समोर आणली. याचा राग म्हणून मोदी सरकारने त्यांना जोधपूर येथे तुरुंगात डांबले आहे. दुसरीकडे पुण्यातील अट्टल गुन्हेगार नीलेश घायवळ हा बनावट पत्ता व बनावट पारपत्र तयार करून लंडनला पळून गेला. हा गुन्हेगार सरकारच्या मदतीमुळेच लंडनला सुरक्षितपणे निघून गेला. बनावट पत्त्यावर पारपत्र तयार करणे, लंडन सारख्या ठिकाणी व्हिसा मिळणे या बाबी सरकारी मदतीशिवाय अशक्य आहेत, असा आरोप यावेळी आंदोलकांनी केला.
मुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या गोष्टीची चौकशी करावी. नेहमीप्रमाणे कोणालाही अभय न देता गुन्हेगारांना कडक शासन करावे, मोदी सरकारने सोनम वांगचुक यांची तुरुंगातून सुटका करावी, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार ) पक्षाच्या वतीने करण्यात आली. वाढत्या गुन्हेगारीमुळे जनता भयभीत असताना देवेंद्र फडणवीस गुन्हेगारांना अभय देत आहेत, त्यांनी ताबडतोब राजीनामा द्यावा, अशी मागणी करण्यात आली.
यावेळी उदय महाले, अनिता पवार, रमीझ सय्यद, किशोर कांबळे, हेमंत बधे, शैलेंद्र बेल्हेकर, प्रसाद कोद्रे, पप्पू घोलप, आसिफ शेख, डॉ. शशिकांत कदम, युसूफ शेख, रुपाली शेलार, नरेंश पगडालु, गणेश नलावडे यांच्यासह मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.