आकाशवाणीच्या पुणे वृत्त विभागाची व्यथा

पुणे : आकाशवाणीच्या राज्यातील अन्य केंद्रांवरील वृत्त विभागांच्या तुलनेत कमी मनुष्यबळ आणि कमी खर्चात पुणे वृत्त विभाग सर्वाधिक वार्तापत्रे करत असल्याचे समोर आले आहे. तरीही केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्रालयाकडून पुणे वृत्त विभागाची उपेक्षा करण्यात येत असून, अत्यल्प मनुष्यबळाचा फटका पुणे वृत्त विभाग गेल्या चार वर्षांपासून सहन करत आहे.

केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने चार वर्षांपूर्वी आकाशवाणीच्या वृत्त विभागांतील पदांमध्ये बदल केला. मंत्रालयाच्या या बदलात पुणे वृत्त विभागातील दोन पदे संपुष्टात आल्याने येत्या काळात पुण्याचे वार्तापत्र कायम राहिले, तरी प्रशासकीय कामकाज मुंबईतून होण्याची चिन्हे आहेत. त्यामुळे पुणे वृत्त विभागाच्या अस्तित्वावरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. या पार्श्वभूमीवर अधिक माहिती घेतली असता राज्यातील अन्य केंद्रांवरील वृत्त विभागांच्या तुलनेत पुणे वृत्त विभागातून सर्वाधिक वार्तापत्रे केली जात असल्याची माहिती समोर आली आहे.

आकाशवाणीच्या मुंबई वृत्त विभागात माहिती सेवेतील चार अधिकारी, दोन कायम वृत्त निवेदक आहेत. तसेच दोन कंत्राटी वृत्त निवेदक आहेत. त्यातील सात कार्यरत आहेत. मुंबई वृत्त विभागाकडून तीन वार्तापत्र दिली जातात.

नागपूर वृत्त विभागात एक अधिकारी, एक कंत्राटी वृत्तनिवेदक मिळून दहा मिनिटांचे वार्तापत्र करतात. औरंगाबाद वृत्त विभागात एक अधिकारी, एक उर्दू वृत्त निवेदक आणि दोन कंत्राटी कर्मचारी मिळून उर्दू आणि मराठी अशी दोन वार्तापत्रे देतात. तर पुणे केंद्रात एक अधिकारी, एक वृत्तनिवेदक आणि एक

कंत्राटी कर्मचारी मिळून तीन राष्ट्रीय वार्तापत्र, एक प्रादेशिक वार्तापत्र, करोना विषयक राज्य वार्तापत्र आणि पुण्याचे वार्तापत्र अशी सहा वार्तापत्रे केली जातात.

त्यापैकी पुण्याचे वार्तापत्र वगळता अन्य सर्व वार्तापत्रे अन्य केंद्रांवरूनही प्रक्षेपित केली जातात. त्यामुळे राज्यातील चार वृत्त विभागांमध्ये सर्वाधिक वार्तापत्रे पुणे वृत्त विभागाकडून केली जात असल्याचे स्पष्ट होते. राज्यातील अन्य केंद्रातील वृत्त विभागात अधिकारी आणि वृत्त निवेदकांशिवाय अन्य कर्मचारी कार्यरत आहेत. ते पुणे वृत्त विभागात नाहीत. त्याशिवाय पुणे वृत्त विभागातील वृत्त निवेदक बातम्या देण्याशिवाय समाजमाध्यमांसाठीही काम करतात. हे काम अन्य केंद्रातील वृत्त

निवेदक करत नाहीत. पुणे वृत्त विभागाकडून चालवल्या जाणाऱ्या रेडिओ ब्लॉगचे काम अन्य वृत्त विभागांकडून के ले जात नाही. मनुष्यबळच कमी असल्याने पुणे वृत्तविभागाचा खर्च अन्य विभागांच्या तुलनेत कमी असल्याची माहिती सूत्रांनी दिली.