शिक्षण पद्धत लक्षात घेऊन शिक्षणशास्त्र पदविका अभ्यासक्रम (डीएड) अद्ययावत करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. जवळपास दहा वर्षांनंतर डीएडचा अभ्यासक्रम बदलण्यात येणार असून पुढील शैक्षणिक वर्षांपासून (२०१४-१५) नवा अभ्यासक्रम लागू करण्यात येणार असल्याचे महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेचे संचालक एन. के. जरग यांनी ‘लोकसत्ता’ शी बोलताना सांगितले.
 गेल्या काही वर्षांमध्ये शिक्षण पद्धतीमध्ये अनेक बदल झाले. पहिली ते अगदी दहावीपर्यंतचे अभ्यासक्रमही बदलले. मात्र, प्राथमिक शिक्षक होण्यासाठी आवश्यक पात्रता असणाऱ्या डीएडचा अभ्यासक्रम मात्र बदलण्यात आला नव्हता. मात्र, आता डीएडचा अभ्यासक्रम अद्ययावत करण्यात येणार आहे. पुढील शैक्षणिक वर्षांपासून म्हणजे २०१४-१५ पासून डीएडचा नवा अभ्यासक्रम लागू करण्यात येणार आहे. राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखडय़ाच्या निकषानुसार नवा अभ्यासक्रम असणार आहे. नवा अभ्यासक्रम तयार करण्याचे काम महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेतर्फे करण्यात येत आहे. सध्याच्या अभ्यासक्रमामध्ये कशा प्रकारे बदल व्हावेत, नवे कोणते मुद्दे असावेत याचा आढावा घेऊन, त्याप्रमाणे अभ्यासक्रमामध्ये बदल करण्यासाठी तज्ज्ञांची समिती नेमण्यात येणार आहे.
याबाबत जरग यांनी सांगितले, ‘‘अलीकडच्या काळामध्ये शिक्षण पद्धतीमध्ये अनेक बदल होत गेले आहेत. त्याचप्रमाणे शिक्षणामध्ये अनेक नवे कायदे आले आहेत, नव्या पद्धती आल्या आहेत, तंत्रज्ञानाचा वापरही वाढला आहे. मात्र, या पाश्र्वभूमीवर डीएड अभ्यासक्रम अद्ययावत झालेला नाही. सध्या राज्यात लागू असलेला डीएडचा अभ्यासक्रम हा दहा वर्षे जुना आहे. बदलत्या प्रवाहांचा विचार करून डीएड अभ्यासक्रम अद्ययावत करण्यात येणार आहे. शिक्षणातील नवे प्रवाह, तंत्रज्ञान, बदललेली परीक्षा पद्धती, अभ्यासक्रम या सर्वाचा विचार करून नवा अभ्यासक्रम तयार करण्यात येणार आहे. पुढील वर्षांपर्यंत नवा अभ्यासक्रम आराखडा तयार होऊन, तो लागू करण्यात येईल.’’