पुणे : पल्मनरी अस्परजिलोसिस म्हणजेच फुफ्फुसातील बुरशी संसर्ग हा श्वसनविकाराच्या रुग्णांमध्ये आढळून येत असे. आता सर्वसाधारण व्यक्तींमध्येही हा संसर्ग वाढला आहे. वाढत्या प्रदूषणासह पावसाळ्यातील ओलसर हवेमुळे यात वाढ झाल्याचे निरीक्षण आरोग्यतज्ज्ञांनी नोंदविले आहे. या पार्श्वभूमीवर काळजी घेण्याचा सल्लाही देण्यात आला आहे.

पुण्यात नुकतीच अशी दोन प्रकरणे समोर आली आहेत. श्वसनविकार नसलेल्या रुग्णांमध्ये फुफ्फुसातील बुरशी संसर्ग आढळून आला आहे. यातील पहिला रुग्ण ४६ वर्षीय पुरुष आहे. त्याला सतत कोरडा खोकला येत होता. याचबरोबर अधूनमधून तापही येत होता. त्याचे वजन कमी झाले होते. त्याच्या छातीच्या स्कॅनमध्ये डाव्या फुफ्फुसाच्या खालच्या भागात न्यूमोनियाचे निदान झाले. त्यामुळे डॉक्टरांनी सुरुवातीला क्षयरोग किंवा कर्करोग असण्याची शक्यता व्यक्त केली. मात्र, ब्रॉन्कोस्कोपी व ब्रॉन्कोॲल्व्हिओलर लावेज (बीएएल ) तपासणीत ॲस्परजिलस फ्लॅव्हस ही कमी ज्ञात बुरशी प्रजाती आढळली. सध्या रुग्ण पूर्णपणे बरा झाला आहे.

दुसऱ्या घटनेत, ५६ वर्षीय महिलेला छातीच्या उजव्या वरच्या भागात गाठीसारखा वाढलेला भाग आणि फुफ्फुसामध्ये निर्माण होणारी पोकळी आढळून आली. मात्र, बीएएल तपासणीत ॲस्परजिलस नायजर ही बुरशी आढळली. तिच्यावर यशस्वी उपचार करण्यात आले असून तिच्या फुफ्फुसातील जखम हळूहळू बरी झाली. फुफ्फुसातील बुरशी संसर्ग हा प्रामुख्याने श्वसनविकाराच्या रुग्णांमध्ये तीव्र स्वरूपाची ॲलर्जीच्या प्रतिक्रियेमुळे होतो. तसेच, रोगप्रतिकारशक्ती कमी असलेल्या रुग्णांमध्येही या संसर्गाचा धोका असतो. मात्र या दोन्ही प्रकरणांमध्ये वाढते प्रदूषण आणि पावसाळ्यातील ओलसर हवा कारणीभूत ठरल्याचे निरीक्षण या रुग्णांवर उपचार करणाऱ्या डॉक्टरांनी नोंदविले आहे.

रोगप्रतिकारशक्ती चांगली असलेल्या व्यक्तींनाही धोका

याबाबत बाणेरमधील मणिपाल हॉस्पिटलमधील श्वसनविकार विभागाचे प्रमुख डॉ. नागेश धाडगे म्हणाले, पल्मनरी ॲस्परजिलोसिस आता फक्त रोगप्रतिकारशक्ती कमी असलेल्या रुग्णांपुरता मर्यादित राहिलेला नाही. हवामानातील बदल, वायुप्रदूषण आणि पावसाळ्यातील जास्त आर्द्रता हे घटकही आता बुरशीजन्य संसर्ग होण्यामागे कारणीभूत ठरत आहेत. त्यामुळे रोगप्रतिकारशक्ती उत्तम असलेल्या व्यक्तींना देखील हा आजार होऊ शकतो. वरील दोन्ही प्रकरणांमध्ये ब्रॉन्कोस्कोपी व बुरशी प्रतिबंधक औषधोपचारामुळे वेळेवर उपचार करणे शक्य झाले आणि धोका टाळता आला. क्षयरोग किंवा कर्करोग नसल्याची खात्री घेतल्यानंतरच आम्ही योग्य निदान करू शकलो. बुरशीचा प्रकार ओळखण्यासाठी ब्रॉन्कोस्कोपी आणि ब्रॉन्कोॲल्व्हिओलर लावेज या तपासण्या उपयुक्त ठरल्या आणि याचमुळे योग्य उपचार करता आले.

पावसाळ्यात श्वसनाच्या तक्रारींबद्दल नागरिकांना दक्ष राहणे आवश्यक आहे. खोकला येणे, ताप आणि वजन कमी होणे यांसारख्या लक्षणांकडे दुर्लक्ष करू नये. हवेतील जास्त आर्द्रतेमुळे बुरशी वेगाने वाढते. त्यामुळे हा संसर्ग होण्याची शक्यताही वाढते. – डॉ. नागेश धाडगे, श्वसनविकारतज्ज्ञ