पुणे : मुंबई-बंगळुरू (एनएच ४८) आणि पुणे-हैदराबाद (एनएच ६५) या राष्ट्रीय महामार्गांवर सातत्याने होणारी वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी आणि अपघात कमी करण्यासाठी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने (एनएचएआय) मोहीम हाती घेतली आहे. गेल्या दोन महिन्यांत १५० पेक्षा अधिक बेकायदा बांधकामे पाडल्यानंतर आता अतिक्रमण करणाऱ्या आणखी १०० जणांना नोटिसा देण्यात आल्या आहेत. या मार्गांवरील नगर परिषद, महापालिका आणि ग्रामपंचायतींच्या हद्दीतील अतिक्रमणे आणि कचरा काढण्यासाठी संबंधित स्थानिक स्वराज्य संस्थांनाही ‘एनएचएआय’ने नोटिसा बजावल्या आहेत.

महामार्ग पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २०२३ आणि २०२४ या वर्षांमध्ये सुमारे पाच हजार अपघात झाले असून, दोन हजार २२६ जणांचा मृत्यू झाला आहे. या वर्षातही अपघातांचे प्रमाण वाढले आहे. या पार्श्वभूमीवर, ‘एनएचएआय’ने स्थानिक पोलीस, वाहतूक पोलीस आणि महापालिकांच्या साहाय्याने अतिक्रमण करणाऱ्यांवर कारवाई करण्यास सुरुवात केली आहे.

गेल्या दोन महिन्यांपासून ही अतिक्रमणविरोधी मोहीम राबविण्यात येत आहे. १५ मार्च ते १५ मे २०२५ या कालावधीत अतिक्रमणे करणाऱ्या ७० जणांना नोटिसा बजावण्यात आल्या होत्या. त्यामध्ये नवले पूल ते खंडाळा या मार्गावरील ३२ आणि खेडशिवापूर-वडगाव या मार्गावरील ४५ जणांचा समावेश होता. तसेच, या महामार्गांवरील अन्य ठिकाणी झालेल्या अतिक्रमणांनाही नोटिसा देण्यात आल्या आहेत. आता आणखी १०० जणांना नोटिसा देण्यात आल्या आहेत. नोटीस दिल्यावर काहींनी स्वत:हून बांधकामे पाडली असल्याचे ‘एनएचएआय’कडून सांगण्यात आले.

अपघातप्रवण ठिकाणी उपाययोजना

महामार्ग पोलिसांनी केलेल्या सूचनांनुसार ‘एनएचएआय’कडून स्थानिक स्वराज्य संस्था, वाहतूक पोलीस आणि इतर संस्थांच्या माध्यमातून अपघातप्रवण क्षेत्रांवर लक्ष केंद्रित करण्यात आले आहे. त्यानुसार नवले पूल, वारजे, वडगाव पूल, कात्रज बोगदा, भोर फाटा, खेड शिवापूर, खंडाळा, कात्रज घाट या आठ ठिकाणी उपाययोजना राबविण्यात आल्या आहेत. सोलापूर महामार्गावर हडपसर, लोणी काळभोर, उरुळी कांचन या ठिकाणी रस्ते रुंदीकरणासाठी अतिक्रमणविरोधी कारवाई करण्यात येत असल्याचे ‘एनएचएआय’कडून सांगण्यात आले.

महामार्गावरील अतिक्रमण करणाऱ्यांविरुद्ध आणि कचरा टाकणाऱ्यांविरुद्ध कडक कारवाई करण्यास सुरुवात करण्यात आली आहे. या मार्गांवर आपत्कालीन परिस्थितीत वाहन थांबवणे कठीण झाले आहे. त्यामुळे प्राधिकरणाने संबंधित आस्थापना आणि नागरिकांविरुद्ध कारवाई करण्याचा निर्णय घेतला आहे.- संजय कदम, प्रकल्प संचालक, एनएचएआयमुळे प्राधिकरणाने संबंधित आस्थापना आणि नागरिकांविरुद्ध कारवाई करण्याचा निर्णय घेतला आहे.- संजय कदम, प्रकल्प संचालक, एनएचएआय