पुणे : १ जून ते ३० सप्टेंबर या काळात राज्याची सरासरी ९९४.५ मिमी असताना ९६५.७ मिमी पाऊस झाला आहे. त्यामुळे यंदा सरासरीपेक्षा केवळ तीन टक्के कमी पाऊस झाला असला तरी राज्यातील नऊ जिल्ह्यांची स्थिती चिंताजनक असल्याचे आकडेवारीवरून समोर आले असून सांगलीमध्ये सरासरीच्या ४४ टक्केच पाऊस झाला आहे.

सांगलीमध्ये सरासरी ४८६.१ मिमी पाऊस पडतो, यंदा केवळ २७२.७ मिमी पाऊस झाला आहे. सांगलीच्या पश्चिम शिराळा, वाळवा तालुक्यात चांगला पाऊस झाला असला तरी भागात कमी पाऊस पडल्यामुळे दुष्काळसदृश स्थिती आहे. सातारा जिल्ह्यात सरासरीपेक्षा ३७ टक्के तर सोलापुरात सरासरीपेक्षा ३० टक्के कमी पाऊस पडला.

हेही वाचा >>> Monsoon Update: दक्षिण कोकणात पुढील दोन दिवस मुसळधार; हवामान विभागाचा अंदाज 

विभागनिहाय स्थिती 

कोकण विभागात २८७०.८ मिमी सरासरी पाऊस पडतो, यंदा ११ टक्के जास्त, ३१७७.६ मिमी पाऊस झाला. मात्र रत्नागिरीत २ टक्के कमी पाऊस झाला. मध्य महाराष्ट्रात १२ टक्के तर मराठवाडय़ात ११ टक्के कमी पाऊस झाला आहे. विदर्भात २ टक्के पावसाची तूट आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

रत्नागिरीत पावसाचा धुमाकूळ

अरबी समुद्रातील कमी दाबाच्या पट्टय़ामुळे रत्नागिरी जिल्ह्यात रविवारी पावसाने धुमाकूळ घातला. रत्नागिरी, खेड, दापोली, राजापूर आणि संगमेश्वर या पाच तालुक्यांना पावसाचा सर्वाधिक तडाखा बसला. यामुळे सखल भागात पाणी साचले होते. बावनदी, निवळी परिसरात माती रस्त्यावर आल्यामुळे मुंबई-गोवा महामार्गावरील वाहतूक दीड तास बंद होती.