पुणे : दक्षिण कोकणात पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे. प्रामुख्याने सिंधुदुर्ग, रत्नागिरी; तसेच कोल्हापुरात जोरदार पावसाची शक्यता आहे. हवामान विभागाने रविवारी सिंधुदुर्गला लाल तर कोल्हापूरला ‘केसरी अलर्ट’ दिला आहे. पूर्व - मध्य अरबी समुद्रावर तयार झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्राचे शनिवारी तीव्र कमी दाबाच्या क्षेत्रात रुपांतर झाले आहे. हे तीव्र कमी दाबाचे क्षेत्र आता शनिवारी रात्री पणजीपासून ११० किलोमीटर तर रत्नागिरीपासून १३० किलोमीटर अंतरावर होते. या तीव्र कमी दाबाच्या क्षेत्राची वाटचाल पूर्व-ईशान्य दिशेने सुरू आहे. शनिवारी रात्री कमी दाबाचे क्षेत्र कोकण किनारपट्टीवरून पुढे जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे पुढील दोन दिवस सिंधुदुर्ग, रत्नागिरी आणि कोल्हापूर जिल्ह्यात मुसळधार पाऊस पडण्याचा अंदाज आहे. दक्षिण महाराष्ट्रातही सर्वदूर मध्यम ते जोरदार पाऊस पडण्याचा अंदाज आहे. कमी दाबाच्या क्षेत्राचा जमिनीवरून प्रवास सुरू होताच पावसाचा जोर कमी होण्याची शक्यता आहे. बुधवारी, ४ ऑक्टोबरपासून राज्यातून मोसमी पावसाच्या परतीचा प्रवास सुरू होण्याची शक्यता आहे.