पुणे : ‘देशातील पायाभूत सुविधा क्षेत्रात मोठी क्रांती घडवून आणण्याच्या संकल्प केंद्र सरकारने केला आहे. त्या दृष्टीने पुढील दहा वर्षांत अडीच ते तीन लाख कोटी रुपयांच्या बोगदे मार्ग प्रकल्पांची उभारणी करण्यात येणार आहे,’ अशी माहिती केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी केली.
‘देशातील भूगर्भ रचना वेगवेगळी असल्याने संशोधन आणि प्रशिक्षण अत्यंत गरजेचे असून, त्यासाठी माझ्या मंत्रालयाकडून यंत्रसामग्री, प्रशिक्षण आणि आवश्यक संसाधनांसाठी सहकार्य करण्यात येईल,’ असे आश्वासनही त्यांनी दिले. ‘एमआयटी विश्वशांती विद्यापीठात ‘इंटरनॅशनल टनेलिंग असोसिएशन’च्या सहकार्याने ‘सस्टेनेबल टनेलिंग फॉर बेटर लाईफ’ या आंतरराष्ट्रीय कार्यशाळेच्या उद्घाटनावेळी गडकरी बोलत होते.
विद्यापीठाचे संस्थापक अध्यक्ष डॉ. विश्वनाथ कराड, कार्याध्यक्ष प्रा. राहुल कराड, विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. रवीकुमार चिटणीस, शैक्षणिक प्रमुख डॉ. प्रसाद खांडेकर, आंतरराष्ट्रीय टनेलिंग असोसिएशनचे माजी अध्यक्ष अरनॉल्ड डिक्स या वेळी उपस्थित होते. याच कार्यक्रमात भुयारी मार्ग अभियांत्रिकी क्षेत्रातील योगदानासाठी एस के. धर्माधिकारी यांना जीवनगौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला.
दिल्ली, बंगळुरू अशा शहरांसह देशभरात बोगदे करण्यात येणार असल्याचे सांगून गडकरी म्हणाले, ‘भुयारी मार्गांसाठीची यंत्रसामग्री चीनमधून येते. मात्र, आता देशातच त्याची निर्मिती करण्याची गरज आहे. सुरक्षिततेसाठी कृत्रिम बुद्धिमत्तेसारख्या तंत्रज्ञानाची गरज आहे. या क्षेत्रात स्वयंपूर्ण होण्याचा निर्धार केला पाहिजे. बोगदा बांधणीचा खर्च कमी करताना गुणवत्ता कायम ठेवावी लागेल. त्यासाठी सीएनजी, इथेनॉल, हायड्रोजन आणि इलेक्ट्रिक इंधनांचा वापर वाढवणे गरजेचे आहे. जुन्या यंत्रसामग्रीचे पुनर्निर्माण करणे, युरोपातील ऑस्ट्रिया, नॉर्वे आणि स्पेनमधून वापरलेल्या यंत्रणा आयात करणे आणि पुढे जाऊन भारतातच त्या उत्पादनात आणणे, ही दिशा असली पाहिजे.
उत्कृष्टता केंद्राची स्थापना
कार्यशाळेत भारत, युरोप, युनायटेड किंग्डम, अमेरिका अशा देशांतील तज्ज्ञांचा सहभाग आहे. याच कार्यक्रमात ‘सेंटर ऑफ एक्सलन्स फॉर टनेलिंग अँड अंडरग्राऊंड कन्स्ट्रक्शन’चे उद्घाटन करण्यात आले. हे केंद्र ‘सँडविक’ आणि ‘टाटा प्रोजेक्ट्स’ यांच्या सहकार्याने उभारण्यात आले आहे. त्यात टनेल मॉनिटरिंग, ड्रिलिंग अँड ब्लास्टिंग प्रयोगशाळांचा समावेश आहे. दोन कोटी रुपये किमतीची उपकरणे या केंद्रात बसवण्यात आली आहेत. या केंद्राद्वारे उद्योग आणि शिक्षण क्षेत्र एकत्र येऊन बोगदा अभियांत्रिकीसारख्या विशेष क्षेत्रात देश आघाडीवर येईल, असे प्रा. कराड यांनी सांगितले.
‘काही कंत्राटदार, टोलवाल्यांना तुरुंगात टाकणार’
‘कंत्राटदारांची तांत्रिक पात्रता आणि आर्थिक पात्रता यात थोडी सवलत दिली होती. मात्र, आता त्याचा मलाच पश्चात्ताप होत आहे. त्यातून खूप वाईट दर्जाचे कंत्राटदार आले. आता काही कंत्राटदार, टोलवाल्यांना तुरुंगात टाकणार आहे. आता पुन्हा पात्रता निकष बदलण्यात आले आहेत,’ अशी माहितीही गडकरी यांनी दिली.