पुणे : तरुणाईची मोठी संख्या पुण्यातील ढोल-ताशा पथकांमध्ये आहे. महाराष्ट्रातील विविध ठिकाणी पथके पाहिली. पण, पुण्यासारखी ढोल-ताशा पथके कुठेही नाहीत. पारंपरिक वाद्यांवर कोणत्याही प्रकारचे खटले नाहीत. तसे असतील तर ते नक्की थांबवू. यावर्षी पारंपरिक वाद्यांवर खटले होणार नाहीत, अशी ग्वाही पोलीस सहआयुक्त रंजनकुमार शर्मा यांनी दिली. ‘गेल्या वर्षी लेझर लाईट बंद करण्यात आम्ही यशस्वी झालो. त्याप्रमाणे यावर्षी ‘डीजे’ चे करता आले तर प्रयत्न करुया, असेही त्यांनी स्पष्ट केले.

ढोल-ताशा महासंघ महाराष्ट्रतर्फे पुणे शहरातील ढोल-ताशा पथकांचा प्रातिनिधीक वाद्यपूजनाचा कार्यक्रम ग्रामदैवत कसबा गणपती मंदिरात झाला. त्याप्रसंगी शर्मा बोलत होते. परिमंडळ एकचे पोलीस उपायुक्त ऋषिकेश रावले, श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्टचे अध्यक्ष सुनील रासने, कोषाध्यक्ष महेश सूर्यवंशी, कसबा गणपती मंदिराचे मुख्य विश्वस्त विनायक ठकार, महासंघाचे अध्यक्ष पराग ठाकूर, महासंघाचे अ‍ॅड. शिरीष थिटे, विलास शिगवण, अक्षय बलकवडे, अमर भालेराव, ओंकार कलढोणकर यांच्यासह शहरातील ढोल-ताशा पथकांचे प्रमुख आणि विविध गणेशोत्सव मंडळाचे पदाधिकारी या वेळी उपस्थित होते.

शर्मा म्हणाले, ‘आपल्या पारंपरिक गोष्टी जागतिक स्तरावर जात आहेत. ढोल-ताशा देखील जागतिक स्तरावर पोहोचला असून पुण्यातील २७ हजार वादकांच्या शक्तीचा उपयोग उत्सवकाळात कसा करता येईल, हे देखील पाहू.’

रावले म्हणाले, ‘ढोल-ताशा पथकातील वादकांचा वादन करताना आजूबाजूच्या लोकांना त्रास व्हावा, हा उद्देश नसतो. पुण्याच्या गणेशोत्सवात पोलिसांचे काम अवघड आहे, असे मी वरिष्ठांकडून ऐकले आहे. मात्र, आपल्या सर्वांच्या सहकार्याने कोणतीही अडचण न येता, हा उत्सव आपण साजरा करु. याकरिता लवकरच बैठक घेऊ.’

सूर्यवंशी म्हणाले, ‘ढोल-ताशा वादनाने सर्वांमध्ये चैतन्य निर्माण होते. मर्यादेपेक्षा आवाज वाढल्याने खटले भरले जातात. मात्र, जी मर्यादा आहे, तेवढा आवाज निर्मिती करणारे वाद्य निर्मिती केल्यास कार्यकर्त्यांवर खटले होणार नाहीत. उत्सवकाळात शहराच्या पूर्व भागात कमी प्रमाणात गर्दी होते. त्यासाठी पूर्व भागात ढोल-ताशा वादन, रंगावली प्रदर्शन असे उपक्रम व्हायला हवेत.’

ठाकूर म्हणाले, ‘अमेरिका, ऑस्ट्रेलिया, कॅनडा अशा अनेक ठिकाणी पुण्याची ढोल-ताशा संस्कृती पोहोचली आहे. महाराष्ट्राची ढोल ताशा ही ओळख आहे. उत्सव डीजे मुक्त उत्सव करण्यासाठी सर्वांचा सहभाग गरजेचा आहे. पथकांमध्ये शालेय विद्यार्थ्यांचे बरची पथक, टिपरी, घुंगुरकाठी पथक सहभागी करुन घ्यायला हवे. त्यामुळे मुलांना देखील आनंद घेता येईल. गणेशोत्सव हा दहा दिवसांचा उत्सव आहे, केवळ शेवटच्या दिवसापुरता तो मर्यादित राहता कामा नये.’

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

ढोल-ताशा पथकांचा सराव सुरू असतो तेव्हा रात्री दहानंतर पोलीस मुख्यालयात तक्रारींचे सर्वाधिक दूरध्वनी येतात. त्यामुळे सर्व पथकांनी आपला सराव लवकर सुरू करून रात्री दहापूर्वी बंद करणे गरजेचे आहे. – रंजनकुमार शर्मा, पोलीस सहआयुक्त.