सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाने कोविशील्ड लसीचे उत्पादन ५० टक्क्यांनी कमी करण्याचा निर्णय घेतला आहे, अशी माहिती सीरमचे सीईओ अदार पूनावाला यांनी मंगळवारी दिली. केंद्राकडून लसीची मागणी नसल्यामुळे कोविशील्डचे उत्पादन कमी करण्याचा निर्णय घेतल्याचं यावेळी त्यांनी सांगितलं. पुढच्या आठवड्यापासूनच लसीचं उत्पादन कमी केलं जाणार असल्याचंही सीएनबीसी टीव्ही १८ शी बोलताना ते म्हणाले.

उत्पादन कमी केलं जाणार असलं तरी देशाला अचानक मोठ्या प्रमाणात लसीची गरज भासल्यास तेवढा साठा ठेवणार असल्याचं ते म्हणाले. “मला आशा आहे की अशी वेळ कधीच येणार नाही, परंतु जर गरज पडली तर पुढचे सहा महिने आम्ही लस देऊ शकत नाही, अशी सांगण्याची वेळ मला येऊ द्यायची नाही,” असे पूनावाला म्हणाले. तसेच भविष्यात देशातील जनतेसाठी कोणताही धोका न पत्करता आपण स्पुटनिक लाइट लसीचे २० ते ३० दशलक्ष डोस साठवणार असल्याचंही त्यांनी सांगितले.

दरम्यान जगभरात करोनाच्या ओमायक्रॉन या नवीन व्हेरिएंटने चिंता वाढवली आहे. या व्हेरिएंटच्या पार्श्वभूमीवर सध्याच्या लसींच्या परिणामकारकतेबद्दल बोलताना पूनावाला म्हणाले की, “आता असलेल्या लसी ओमायक्रॉनवर परिणामकारक ठरणार नाही, यावर विश्वास ठेवण्याचे कोणतेही कारण नाही. तसेच लसीचे दोन डोस घेतल्यानंतर आपल्याला या विषाणूपासून संरक्षण मिळणार नाही, असंही मानलं जाऊ नये. अॅस्ट्राझेनाकाची लस विषाणूंविरूद्ध ८०% परिणामकारक असल्याचं तज्ज्ञांनी सांगितलंय,” अशी माहिती त्यांनी दिली.

कोणत्या राज्यात ओमायक्रॉनचे किती रुग्ण?

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मुंबईत ओमायक्रॉनचे दोन रुग्ण आढळले असून, राज्यातील ओमायक्रॉन बाधित रुग्णसंख्या दहावर पोहोचली आहे. तर देशपातळीवर ही संख्या २३ वर पोहचली आहे. देशामधील सर्वाधिक ओमायक्रॉन बाधित रुग्ण हे महाराष्ट्रामध्ये आहे. महाराष्ट्राखालोखाल राजस्थानमध्ये नऊ, कर्नाटकमध्ये दोन तर गुजरातमध्ये ओमायक्रॉनबाधित एक रुग्ण आढळून आलाय. देशाची राजधानी असणाऱ्या दिल्लीमध्येही ५ डिसेंबर रोजी एक ओमायक्रॉन बाधित रुग्ण आढळून आलाय.