पिंपरी : पावसाळ्यात संभाव्य नैसर्गिक आपत्तीमुळे उद्भवू शकणाऱ्या परिस्थितीत नागरिकांना तत्काळ मदत मिळण्यासाठी, अशी परिस्थिती हाताळण्यासाठी महापालिकेच्या क्षेत्रीय कार्यालय स्तरावर उपायुक्त व सहायक आयुक्त पदावरील अधिकाऱ्यांची नोडल अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. आयुक्त शेखर सिंह यांनी याबाबतचा आदेश दिले आहेत.

मागील आठवड्यात दोन दिवस शहरात झालेल्या जोरदार पावसामुळे पूर परिस्थिती निर्माण झाली होती. अनेक ठिकाणी पाणी साचले होते. पावसाळ्यात शहरात गंभीर पूरस्थिती निर्माण झाल्यास महापालिका कार्यक्षेत्रातील मालमत्तांचे रक्षण करणे आणि नागरिकांना आपत्कालीन परिस्थितीत मदत पोहोचविणे आवश्यक आहे. त्यासाठी क्षेत्रीय कार्यालय स्तरावर उपायुक्त व सहायक आयुक्त किंवा पदावरील अधिकाऱ्यांची नोडल अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. नोडल अधिकाऱ्यांनी पावसाळ्यापूर्वी नाल्यांची साफसफाई यांसारख्या कामकाजाची अंमलबजावणी विहित कालावधीत पूर्ण व्हावी यासाठी संबंधित अधिकाऱ्यांशी समन्वय साधावा. तसेच आपत्ती व्यवस्थापन विभागाकडील पूरनियंत्रण आराखड्यानुसार आपत्ती व्यवस्थापन, स्थापत्य, पाणीपुरवठा, आरोग्य, अग्निशमन, वैद्यकीय व विद्युत विभागाशी समन्वय साधून पूरनियंत्रण व आपत्कालीन सेवा सुरळीतपणे पार पाडाव्यात, असे आयुक्त सिंह यांनी आदेशात स्पष्ट केले आहे.