पुणे : महाविकास आघाडीतील नेत्यांनी मनधरणी करण्याचा प्रयत्न केल्यानंतरही कसबा, शिवाजीनगर आणि पर्वती विधानसभा मतदारसंघात बंडखोरी करणाऱ्या काँग्रेसच्या उमेदवारांना शहर काँग्रेसकडून नोटीस बजाविण्यात आली आहे. बंडाची तलवार म्यान करून महाविकास आघाडीच्या अधिकृत उमेदवारांना पाठिंबा जाहीर करावा. तसे न केल्यास निलंबनाची कारवाई करण्याचा निर्णय शहर काँग्रेसने घेतला आहे. तसा प्रस्ताव प्रदेश काँग्रेसलाही पाठविण्यात आला आहे.

महाविकास आघाडीत पर्वतीमधून माजी उपमहापौर, प्रदेश उपाध्यक्ष आबा बागुल, कसबा मतदारसंघातून पुण्याच्या पहिल्या महिला महापौर, माजी महिला प्रदेशाध्यक्ष कमल व्यवहारे आणि शिवाजीनगर मतदारसंघातून खडकी कॅन्टोन्मेंट बोर्डाचे उपाध्यक्ष मनीष आनंद यांनी बंडखोरी केली आहे. त्यांनी बंड मागे घ्यावे, यासाठी महाविकास आघाडीच्या नेत्यांनी सातत्याने प्रयत्न केले होते. मात्र, ते यशस्वी ठरले नाहीत. या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीच्या वतीने बंडखोरांबाबतची भूमिका मंगळवारी पत्रकार परिषदेत स्पष्ट करण्यात आली. काँग्रेस शहराध्यक्ष अरविंद शिंदे, राष्ट्रवादी (शरद पवार) पक्षाचे प्रभारी शहराध्यक्ष अंकुश काकडे, शिवसेना (ठाकरे) पक्षाचे शहरप्रमुख संजय मोरे आणि गजानन थरकुडे यांच्यासह अन्य पदाधिकारी या वेळी उपस्थित होते.

हेही वाचा – पिंपरी : चिमुकल्याच्या मृत्यूप्रकरणी तीन डॉक्टरसह दोन परिचारिकांवर गुन्हा

‘राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आणण्यासाठी बंडखोरी करू नये, अशी पक्षाच्या नेत्यांची भूमिका होती. त्यासाठी स्थानिक पातळीवरील नेत्यांनी त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. त्यासाठी सातत्याने बैठका घेतल्या. पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनीही त्यांच्याशी संपर्क साधला होता. अजूनही वेळ गेलेली नाही. त्यांना शेवटची संधी म्हणून नोटीस बजाविण्यात आली आहे. महाविकास आघाडीच्या अधिकृत उमेदवारांना बंडखोरांनी पाठिंबा जाहीर केल्यास त्यांच्यावर कारवाई करण्यात येणार नाही. मात्र, तसे न केल्यास निलंबनाची कारवाई करण्यात येईल. तसा प्रस्तावही प्रदेश काँग्रेसला पाठविण्यात आला आहे,’ असे शिंदे यांनी स्पष्ट केले.

‘महाविकास आघाडीतील अनेक ठिकाणची बंडखोरी रोखण्यात यश आले. मात्र, काही ठिकाणी प्रयत्न करूनही अपयश आले. बंडखोरीची भूमिका कायम राहिली, तर आगामी महापालिका निवडणुकीतही त्यांना महाविकास आघाडीतील कोणत्याही पक्षासाठीचे दरवाजे बंद असतील. महाविकास आघाडीतील कोणत्याही पक्षात त्यांना घेतले जाणार नाही. स्थानिक पातळीवरील नेत्यांमध्ये त्या संदर्भात एकमत झाले असून, तसा ठराव महाविकास आघाडीच्या नेत्यांकडे पाठविला जाणार आहे,’ असे काकडे यांनी सांगितले.

हेही वाचा – पिंपरी-चिंचवडमध्ये महायुतीच्या प्रचाराचा उद्या प्रारंभ; देवेंद्र फडणवीस यांची काळेवाडीत सभा

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

…तर पूजा आनंद पदमुक्त

शिवाजीनगरमधील काँग्रेसचे बंडखोर मनीष आनंद यांची पत्नी पूजा शहर महिला अध्यक्ष आहेत. त्यामुळे त्यांनीही त्यांची भूमिका तातडीने स्पष्ट करावी, यासाठी त्यांनाही नोटीस बजाविण्यात आली आहे. त्यांनी महाविकास आघाडीच्या उमेदवाराला पाठिंबा देत असल्याचे लेखी कळविल्यास कारवाईबाबतचा पुनर्विचार केला जाईल. मात्र, तसे न कळविल्यास त्यांना पदमुक्त केले जाईल, असे शिंदे यांनी नमूद केले.