पुणे : कोंढव्यातील कथित बलात्कार प्रकरणात पोलिसांना फिर्याद दिलेल्या संगणक अभियंता तरुणीच्या मित्राला पोलिसांनी नोटीस बजावली आहे.‘या प्रकरणात मित्राला अटक करण्यात येणार नाही. पोलिसांना तपासात सहकार्य करावे, तसेच तपासकामी बाेलावण्यात आल्यानंतर पोलीस ठाण्यात उपस्थित राहण्याबाबत नोटीस बजावण्यात आली आहे,’ अशी माहिती परिमंडळ पाचचे पोलीस उपायुक्त डाॅ. राजकुमार शिंदे यांनी दिली.
कोंढव्यातील बलात्कार प्रकरणात तरुणीने दिलेल्या तक्रारीबाबत संभ्रम निर्माण झाला आहे. या प्रकरणी पोलिसांनी ताब्यात घेतलेला संशयित तरुणीचा मित्र असल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले. तरुणाला पुणे शहराबाहेर जाण्यास पोलिसांनी मनाई केली आहे.
कोंढव्यातील एका उच्चभ्रू सोसायटीत बुधवारी (२ जुलै) एका संगणक अभियंता तरुणीवर बलात्कार झाल्याची घटना घडल्याची तक्रार पोलिसांकडे देण्यात आली. पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांसह सुमारे ५०० पोलीस कर्मचारी या प्रकरणाचा तपास करत होते. तपासात तरुणीच्या घरात शिरलेला संशयित तरुण हा कुरिअर कंपनीतील कर्मचारी नसल्याचे उघडकीस आले होते.