उमेदवार नसलेल्या व्यक्तींना परीक्षा केंद्रात नेल्याबद्दल कारवाई

Baramati Namo Maharojgar Melava
निमंत्रण पत्रिकेतील आणखी एक घोळ सुधारण्यासाठी प्रशासनाची धावाधाव
10th exam maharashtra
राज्यात दहावीची परीक्षा सुरू, पहिल्या दिवशी कॉपी प्रकरणे किती?
treatment in private hospitals
गरीब रुग्णांना खासगी, धर्मदाय रुग्णालयात उपचार मिळणार, राज्यस्तरीय विशेष मदत कक्ष कार्यान्वित
Urban Planning Exam marathi news
नगर रचना विभागाची परीक्षा दिलेल्या उमेदवारांसाठी मोठी बातमी, ‘या’ तारखेला होणार कागदपत्रांची पडताळणी

पुणे: महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी) राज्यसेवा पूर्व परीक्षा २०२१ ची प्रश्नपत्रिका नागपूरमधील केंद्रावर फुटल्याच्या चर्चेची एमपीएससीने गांभीर्याने दखल घेतली आहे. प्रश्नपत्रिका फुटली नसल्याचे स्पष्ट करून एमपीएससीने नागपूर जिल्हाधिकाऱ्यांकडून या संदर्भात वस्तुस्थितीदर्शक खुलासा मागवला असून, उमेदवार नसलेल्या व्यक्तींना परीक्षा केंद्रात नेलेल्या अधिकाऱ्यावर शिस्तभंगाची कारवाई, संबंधित व्यक्तींवर गुन्हा दाखल करण्याची सूचना एमपीएससीने नागपूरच्या पोलीस आयुक्तांना केली आहे.

 एमपीएससीकडून रविवारी राज्यभरातील ७२४ परीक्षा केंद्रांवर राज्य सेवा पूर्व परीक्षा २०२१ आयोजित करण्यात आली. करोनाच्या प्रादुर्भावामुळे आणि वय उलटून गेलेल्या उमेदवारांना एक संधी देण्याच्या राज्य शासनाच्या निर्णयामुळे राज्यसेवा पूर्व परीक्षा २०२१ या परीक्षेला काहीसा विलंब झाला आहे. या परीक्षेसाठी राज्यभरातील अडीच लाखांहून अधिक उमेदवारांनी नोंदणी केली आहे. रविवारी सकाळी नागपूरमधील परीक्षा केंद्रावर प्रश्नपत्रिका फुटल्याची चर्चा समाजमाध्यमांत सुरू झाल्याने काही काळ गोंधळ निर्माण झाला होता. मात्र एमपीएससीकडून तातडीने प्रश्नपत्रिका फुटली नसल्याचे स्पष्ट करण्यात आले. नागपूरमधील परीक्षा केंद्रात उमेदवार नसलेल्या काही बाह्य व्यक्तींनी प्रवेश केल्याची, त्यांना गोपनीय माहिती दाखवण्यात आल्याची माहिती एमपीएससीला मिळाल्याने एमपीएससीने या प्रकाराची गंभीर दखल घेत नागपूर जिल्हाधिकाऱ्यांकडून वस्तुस्थितीदर्शक खुलासा मागवला आहे.

अधिकृत व्यक्तीशिवाय अन्य कोणीही व्यक्ती किंवा वाहनास परीक्षा उपकेंद्रात प्रवेश देण्यात येऊ नये, अशा  सूचना असूनही उमेदवारांव्यतिरिक्त अन्य व्यक्तींना परस्पर प्रवेश देण्याचा निर्णय कोणत्या प्राधिकारात घेण्यात आला, त्या व्यक्तींना परीक्षेची गोपनीय सामग्री कशी दाखवण्यात आली  याविषयी माहिती द्यावी, असे जिल्हाधिकाऱ्यांना सूचित करण्यात आले आहे. तर, उमेदवारांव्यतिरिक्त अन्य व्यक्तींना प्रवेश देणे बेकायदा आणि शासकीय कामकाजात अडथळा आणणारे कृत्य आहे. त्यामुळे या प्रकरणातील अधिकारी, कर्मचाऱ्यांना निलंबित करून नियमानुसार कडक कारवाई करण्यात यावी, तसेच अनधिकृतरीत्या परीक्षा केंद्रात प्रवेश करून आंदोलन करणाऱ्या संबंधितांवर गुन्हे दाखल करावेत, परीक्षेचे संवेदनशील स्वरूप लक्षात घेऊन या संदर्भातील कार्यवाहीचा अहवाल तातडीने सादर करावा, अशा सूचना नागपूर पोलीस आयुक्तांना करण्यात आल्या

आहेत.

 परीक्षेला ७० टक्के उपस्थिती

राज्य सेवा पूर्व परीक्षा २०२१ या परीक्षेला सुमारे ७० टक्के उमेदवारांची उपस्थिती होती. करोना प्रादुर्भावाचा परीक्षेच्या उपस्थितीवर विशेष परिणाम झालेला नाही. सर्वसाधारण काळातही २० ते ३० टक्के उमेदवार अनुपस्थित  असतात, अशी माहिती एमपीएससीकडून देण्यात आली.

अभाविप, भाजयुमोचे आंदोलन

नागपूर : सरळसेवा भरतीमधील पेपरफुटीच्या प्रकरणाने राज्यातील वातावरण तापले असताना नागपुरातील एका केंद्रावर राज्य लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी) पूर्व परीक्षेच्या प्रश्नसंच वेळेपूर्वीच फुटल्याच्या कथित प्रकरणाने परीक्षा व्यवस्थेवर गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत. याविरोधात अखिल भारतीय विद्यार्थी परिषद आणि भारतीय जनता युवा मोर्चाने तीव्र आंदोलन केले. मात्र, आयोगाने सर्व आरोप फेटाळून लावत असा कुठलाही गैरप्रकार झाला नसल्याचे स्पष्टीकरण दिले आहे. दरम्यान, रविवारी सकाळी शहरातील अनेक परीक्षा केंद्रांना एमपीएससीच्या अध्यक्षांनी भेट देऊन व्यवस्थेची पाहणी केली.  रविवारी सकाळी १० वाजता शहरातील साऊथ पॉइंट स्कूलच्या केंद्रावर एमपीएससी पूर्व परीक्षेचा पेपर होता. या केंद्रावर परीक्षा सुरू होण्याआधीच प्रश्नसंच फुटला असल्याचा आरोप करण्यात आला आहे.