पुणे : महापालिकेच्या कात्रज येथील राजीव गांधी प्राणी संग्रहालयातील १६ चितळांच्या मृत्यूप्रकरणी महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त ओमप्रकाश दिवटे यांनी उद्यान अधीक्षकांसह प्राणी संग्रहालयाच्या संचालकांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. पुढील तीन ते चार दिवसांत याचा खुलासा करणारा अहवाल सादर करावा, असे आदेश या दोन्ही अधिकाऱ्यांना देण्यात आले आहे.

कात्रज येथील महापालिकेच्या राजीव गांधी प्राणी संग्रहालयामध्ये शंभरहून अधिक हरणे आहेत. पंधरा दिवसांपूर्वी आठवड्याभरात सलग एक-दोन हरणांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर काही दिवसांच्या अंतराने प्राणी संग्रहालयातील सुमारे १६ चितळांचा मृत्यू झाला होता. तपासणी अहवालानंतर या चितळांना ‘लाळ खुरकत’ या विषाणूजन्य आजाराचे संक्रमण होऊन त्यांचा मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले आहे.

या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करण्याच्या सूचना महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांनी दिल्या होत्या. त्यानंतर महापालिका अतिरिक्त आयुक्त ओमप्रकाश दिवटे यांनी महापालिकेचे मुख्य उद्यान अधीक्षक अशोक घोरपडे, प्राणी संग्रहालयाचे संचालक डॉ. राजकुमार जाधव यांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. पुढील तीन ते चार दिवसांत याचा खुलासा करणारा अहवाल तातडीने सादर करण्याचे आदेश या नोटिशीद्वारे दिले आहे.

राजीव गांधी प्राणी संग्रहालयात ७ ते १२ जुलै दरम्यान १६ चितळांचा मृत्यू झाला होता. या घटनेमुळे खळबळ उडाली होती. विधानसभेच्या अधिवेशनात यावर चर्चा झाली होती. मृत चितळांच्या मृत्यूचे कारण शोधण्यासाठी  विविध शासकीय संस्थांना समाविष्ट करण्यात आले होते. क्रांतीसिंह नानासाहेब पशुवैद्यकीय महाविद्यालय, शिरवळ आणि विभागीय रोग अन्वेषण प्रयोगशाळा, पशुसंवर्धन विभाग, महाराष्ट्र शासन येथील तज्ञांच्या चमूने मृत प्राण्यांचे शवविच्छेदन करून जैविक नमुने गोळा केले होते.

हे नमुने राष्ट्रीय लाळ खुरकत संशोधन केंद्र, भुवनेश्वर (ओरिसा), भारतीय पशुवैद्यकीय संशोधन संस्था, बरेली, विभागीय वन्यजीव संशोधन व प्रशिक्षण केंद्र, नागपूर आणि राष्ट्रीय उच्च सुरक्षा प्राणी रोग शाळा, भोपाळ येथे तपासणीसाठी पाठवण्यात आले होते. यापैकी भुवनेश्वर येथील प्रयोगशाळेतून प्राप्त अहवालानुसार प्राण्यांची लक्षणे आणि प्रयोगशाळा तपासणी अहवाल जुळल्याने ‘लाळ खुरकत’ या विषाणूजन्य आजाराचे संक्रमण झाल्याचे निदान झाले आहे.

 या पार्श्वभूमीवर महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांनी संग्रहालयातील प्राण्यांची काळजी व्यवस्थित घेतली जातात का ? कामात काही कुचराई केली जाते का ? असे विविध प्रश्न उपस्थित करून या संदर्भात संग्रहालयातील अधिकाऱ्यांकडून त्यांनी खुलासा मागविला आहे.  मुख्य उद्यान अधीक्षक अशोक घोरपडे, प्राणीसंग्रहालयाचे संचालक डॉ. राजकुमार जाधव यांना नोटिस बजाविण्यात आली आहे. याचा अहवाल येत्या तीन ते चार दिवसांत  देण्याचे आदेश या दोन्ही अधिकाऱ्यांना दिले आहेत.  या अहवालात जर प्राणी संग्रहालय अधिकारी व कर्मचारी दोषी आढळल्यास त्यांच्यावर कारवाई केली जाणार आहे.