पुणे : गेल्या काही वर्षांत जपानी भाषा शिकण्याचा कल वाढत असताना आता जपानी भाषा शिकणे आणखी सुकर होणार आहे. जपानी भाषा अध्यापक स्नेहा असईकर यांनी काकेहाशि या जपानी-मराठी-इंग्रजी शब्दकोशाची निर्मिती केली असून, पहिल्यांदाच अशा प्रकारचा शब्दकोश उपलब्ध होत आहे. या शब्दकोशात १० हजार शब्दांचा समावेश आहे.
जपान हा तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात आघाडीवर असलेला देश आहे. तसेच, जपानमध्ये नोकरीच्या अनेक संधी निर्माण होतात. त्यामुळे शालेय स्तरापासूनच जपानी भाषा शिकणाऱ्यांची संख्या वाढत आहे. लेखक डॉ. सुरेश नाडकर्णी यांची कन्या असलेल्या स्नेहा असईकर २८ वर्षांपासून जपानी भाषेचे अध्यापन करतात. त्यांनी आजपर्यंत एक हजारहून अधिक विद्यार्थ्यांना जपानी शिकवले आहे. मात्र, जपानी शब्दाचा अर्थ मराठी आणि इंग्रजी या दोन भाषांमध्ये एकाच वेळी सांगणारा शब्दकोश आतापर्यंत उपलब्ध नसल्याची उणीव त्यांना जाणवत होती.
ती उणीव दूर करण्यासाठी त्यांनी शब्दकोशाची निर्मिती केली आहे. ‘मी शिकेन’ पब्लिकेशनतर्फे या शब्दकोशाचे प्रकाशन शनिवारी (२० सप्टेंबर) सायंकाळी पाच वाजता सेनापती बापट रस्ता येथील सुमंत मुळगावकर सभागृहात जपानचे भारतातील वाणिज्यिक राजदूत यागी कोजी यांच्या हस्ते होणार आहे.
शब्दकोशाच्या निर्मितीबाबत असईकर म्हणाल्या, ‘जपानी ही आधी बोली भाषा होती. त्यामुळे तिला लिपी नव्हती. मात्र, कालांतराने हिरागाना आणि काताकाना अशा दोन लिपी तयार झाल्या. जपानी शब्दांचा मराठीत अर्थ असलेले दोन शब्दकोश होते. मात्र, त्यांचे स्वरूप फारच मर्यादित होते. काकेहाशि हा शब्दकोश सर्वार्थाने वेगळा आहे. जपानी शब्दांचा मराठीत उच्चार, जपानी चित्राक्षर, इंग्रजी आणि मराठी अर्थ, त्या शब्दाचा वापर कसा करायचा याचे उदाहरण असे या शब्दकोशाचे स्वरूप आहे. चित्रासह भाषेबाबत रंजक टीपाही देण्यात आल्या आहेत. एकूण १० हजार जपानी शब्दांचा शब्दकोशात समावेश आहे. जपानी भाषेच्या पाच परीक्षा असतात. त्यांपैकी चार परीक्षांपर्यंत हा शब्दकोश विद्यार्थ्यांना उपयुक्त ठरेल.’
‘जपानमध्ये ज्येष्ठ नागरिकांची संख्या जास्त आहे. त्यामुळे जपानमध्ये तरुण मनुष्यबळाची मोठ्या प्रमाणात गरज आहे. तिथे मोठ्या प्रमाणात रोजगारसंधी उपलब्ध होत आहेत. त्यामुळे जपानी शिकण्याचा कल वाढतो आहे. त्या दृष्टीने हा शब्दकोश विद्यार्थी, जपानी भाषा शिक्षकांसाठी मार्गदर्शक ठरेल,’ असेही त्यांनी सांगितले.
मराठीतून जपानी शिकणे सहज शक्य
जपानी ही मराठीला खूप जवळची भाषा आहे. त्यामुळे मराठीतून जपानी शिकणे सहजशक्य आहे. मराठीतून जपानी शिकल्यास ती कमी कालावधीत शिकता येते, याकडेही असईकर यांनी लक्ष वेधले.