“ विधानसभा अध्यक्ष कोणाला करावं हा महाविकास आघाडीचा अंतर्गत प्रश्न आहे. भास्कर जाधवांना अध्यक्ष करायला शिवसेनेचं समर्थन आहे का? मला माहिती नाही. भास्कर जाधव यांचा जेवढा उपयोग करायचा तेवढा तिघांनी केला आहे. आता भास्कर जाधवांना काही मिळेल असं कोणत्याही राजकीय शहाण्या माणसाला दिसत नाही.” असं आज(शनिवार) पुण्यात माध्यमांशी बोलताना भाजपा नेते आशिष शेलार यांनी म्हटलं आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

भाजपा नेते आशिष शेलार यांनी आज माध्यमांशी बोलताना विविध मुद्य्यांवर आपली भूमिका स्पष्ट केली. ओबीसी आरक्षण, मुंबई लोकलसह केंद्रीय मंत्रिमंडळात खासदार प्रितम मुंडे यांना स्थान न देण्यात आल्यावर पंकजा मुंडे यांनी स्पष्ट केलेली भूमिका आदी मुद्यांवर शेलार यांनी प्रतिक्रिया दिली.

ओबीसी आरक्षणाच्या मुद्यावर बोलताना शेलार म्हणाले, “ओबीसींची राजकीय आरक्षण केवळ महाविकासआघाडी सरकारच्या नाकर्तेपणामुळे गेलं आहे. ओबीसी राजकीय आरक्षणाबाबत राज्य सरकार दमदार पाऊलं टाकताना दिसत नाही. राज्य सरकार नेमकं काय करतंय? यावर आमचं लक्ष आहे.”

तर, केंद्रीय मंत्रिमंडळात खासदार प्रितम मुंडे यांना स्थान न मिळाल्याने पंकजा मुंडे नाराज असल्याच्या चर्चांवर पंकजा मुंडे यांनी पत्रकारपरिषद घेत आपली भूमिका स्पष्ट केली, याबाबत बोलताना शेलार म्हणाले की, “पंकजाताईंनी मांडलेली भूमिका ही प्रत्येक कार्यकर्त्याला पटणारी आहे. भाजपात कोणतीही नाराजी नाही. हा विषय उगाचच पुढे वाढवला जातोय.”

याचबरोबर मुंबई लोकलच्या मुद्यावर बोलताना शेलार यांनी, “ज्यांचे लसीचे डोस झाले आहेत, ज्यांना करोना होऊन गेला आहे अशांना लोकल वापरू न देणे हा अन्याय आहे. लोकल उपलब्ध करुन देण्यासाठी शास्त्रीय भूमिका घेऊन लोकल उपलब्ध करुन द्यावीच लागेल.” अशा शब्दांमध्ये भूमिका मांडली.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Now no politically savvy man can see that bhaskar jadhav will get anything ashish shelar msr 87 svk
First published on: 10-07-2021 at 19:53 IST