पुणे : टाळ-मृदुंगाचा निनाद आणि हरिनामाचा गजर करीत येत असलेल्या वारकऱ्यांच्या दिंड्यांनी पुणेकरांची बुधवारची पहाट उजाडली. संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराज यांच्या पालखी आगमनाची आता प्रतीक्षा असून वारकऱ्यांच्या सेवेसाठी गणेश मंडळांचे कार्यकर्ते सज्ज झाले आहेत.

संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालखीचे मंगळवारी प्रस्थान होऊन पहिल्या मुक्कामी आजोळघरी पालखी विसावली. या पालखीसह पिंपरी येथे मुक्कामी असलेल्या संत तुकाराम महाराजांच्या पालखीने सकाळी आरती झाल्यावर पुण्याकडे मार्गक्रमण सुरू केले. मुक्कामाच्या ठिकाणची सोय पाहण्यासाठी वारकरी मोठ्या प्रमाणावर पुण्याकडे येऊ लागल्याने पहाटेपासून टाळ-मृदंगाच्या निनादाने वातावरण भक्तिमय झाले. डोईवर तुळशी वृंदावन घेतलेल्या महिला वारकरी दिंडीच्या मध्यभागी आणि हरिनामाचा गजर करणारे वैष्णव असे दृश्य शहराच्या मध्यवर्ती भागांत ठिकठिकाणी दिसून आले. शहरात जणू भक्तीरसाचा मळा फुलून आला. पालकांसंवेत शाळेला जाणाऱ्या विद्यार्थ्यांना सकाळीच वारकऱ्यांचे दर्शन घडले. वारकऱ्यांचा शिधा असलेली वाहने शहरात दिंड्यांचा मुक्काम असलेल्या ठिकाणी आल्याने पुण्यनगरीमध्ये भक्तिपीठ अवतरले.

साधू-संत येती घरा तोचि दिवाळी दसरा या उक्तीनुसार शहराच्या मध्यवर्ती भागातील गणेश मंडळांचे कार्यकर्ते वारकऱ्यांच्या सेवेसाठी सज्ज झाले आहेत. दोन वर्षांनंतर वारकऱ्यांचे आगमन होत असल्याने त्यांच्या सेवेमध्ये कोणतीही कमतरता राहणार नाही याची दक्षता घेतली जात आहे. भोजनासाठी भाज्या आणून, निवडून ठेवण्यापासून ते द्रोण-पत्रावळी, ताट-वाट्यांची स्वच्छता या साऱ्या गोष्टींमध्ये लक्ष घालून काम चोखपणे पार पाडण्यासाठी कार्यकर्त्यांची सकाळपासून लगबग सुरू झाली आहे. आरोग्य शिबीर, मोफत कटिंग-दाढी, छत्री दुरुस्ती अशा स्वरूपाच्या विविध सेवा देण्यासाठी कार्यकर्त्यांची फळी प्रत्येक मंडळाने तयार ठेवली आहे.