पुणे : राज्यातील राष्ट्रीय सेवा योजनेत (एनएसएस) कार्यरत स्वयंसेवकांची नागरी संरक्षण योद्धा म्हणून नावनोंदणी करण्यात येणार आहे. त्यासाठी केंद्र सरकारच्या माय भारत संकेतस्थळावर नोंदणी करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. त्यामुळे आतापर्यंत केवळ सामाजिक क्षेत्रात, आपत्ती निवारणामध्ये योगदान देणाऱ्या ‘एनएसएस’ स्वयंसेवकांना आता नागरी संरक्षणाच्या क्षेत्रात सामावून घेतले जाणार आहे.

‘एनएसएस’चे प्रादेशिक संचालक अजय शिंदे यांनी याबाबतच्या सूचना महाराष्ट्र आणि गोवा राज्यातील विद्यापीठे, ‘एनएसएस’च्या जिल्हा समन्वयकांना परिपत्रकाद्वारे दिल्या आहेत. राष्ट्रीय सेवा योजना ही केंद्र सरकारची योजना आहे. राज्यात उच्च व तंत्रशिक्षण विभागाच्या माध्यमातून ही योजना महाविद्यालये, विद्यापीठांमध्ये राबवण्यात येते. राज्यभरातील महाविद्यालये, विद्यापीठांमध्ये ‘एनएसएस’चे ३ लाख ५६ हजार ८०० स्वयंसेवक आहेत.

‘‘एनएसएस’ हा दोन वर्षांचा उपक्रम असतो. या अंतर्गत ‘एनएसएस’ स्वयंसेवक सामाजिक क्षेत्रात, आपत्ती निवारण, मतदार जागृती, पर्यावरण संवर्धन अशा क्षेत्रांत काम करतात. वर्षभरात स्वयंसेवकांकडून १२० तास काम केले जाते. सध्याच्या युद्धजन्य स्थितीमुळे नागरी संरक्षणासाठी गरज भासल्यास या स्वयंसेवकांना सहभागी करून घेता येऊ शकते. त्या दृष्टीने केंद्रीय युवक आणि क्रीडा विभागाने ‘एनएसएस’ स्वयंसेवकांची नागरी संरक्षण योद्धा म्हणून नोंदणी करण्याचे निर्देश दिले आहेत. ही नोंदणी पूर्णत: ऐच्छिक स्वरूपाची आहे,’ अशी माहिती शिंदे यांनी दिली.

‘एनसीसी’च्या छात्रांचीही नोंदणी

‘एनएसएस’ स्वयंसेवकांनी करोनाकाळात विलगीकरण, पोलीस मित्र, केंद्रीय स्वयंपाकगृह अशा कामात योगदान दिले होते. तसेच सांगली, कोल्हापूर येथील पूरपरिस्थितीवेळीही पुनर्वसनाच्या कामात मदत केली होती. त्यामुळे प्रत्येक जिल्ह्यातील एनएसएस स्वयंसेवक नागरी संरक्षण योद्धा म्हणून जिल्हा प्रशासनाला मदत करू शकतात. ‘एनएसएस’प्रमाणेच ‘एनसीसी’च्या छात्रांचीही नोंदणी माय भारत संकेतस्थळावर करण्यात येत आहे. ‘एनएनएस’अंतर्गत केल्या जाणाऱ्या कामांसाठी श्रेयांक देण्यात येणार आहेत, असेही शिंदे यांनी सांगितले.