पुणे : जागतिक तापमानवाढीमुळे समुद्राचे तापमान दिवसेंदिवस वाढत आहे. यामुळे अरबी समुद्रात मोठी चक्रीवादळे निर्माण होण्याचे प्रमाण वाढले आहे. या चक्रीवादळांचा देशाच्या पश्चिम किनारपट्टी भागाला धोका असून, तारापूर आणि जैतापूरसारख्या अणुऊर्जा प्रकल्पांच्या ठिकाणीही भविष्यात यामुळे मोठी दुर्घटना घडू शकतो, असा इशारा ज्येष्ठ पर्यावरणतज्ज्ञ डॉ. माधव गाडगीळ यांनी दिला.

पुणे इंटरनॅशनल सेंटरच्या (पीआयसी) वतीने आयोजित तापमान आणीबाणी परिषदेचे आयोजन करण्यात आले. त्यात तापमानवाढीचे आव्हान आणि त्यावरील कृती यावर चर्चा करण्यात आली. या परिषदेत डॉ. गाडगीळ बोलत होते. या वेळी परिषदेचे संयोजक व पीआयसीचे विश्वस्त प्रा. अमिताव मलिक, पीआयसीचे अध्यक्ष ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. रघुनाथ माशेलकर, उपाध्यक्ष डॉ. विजय केळकर, अर्थतज्ज्ञ डॉ. अजित रानडे आदी उपस्थित होते.

या वेळी डॉ. गाडगीळ म्हणाले, की अरबी समुद्रात निर्माण झालेली वादळे आधी अरेबियाच्या दिशेने जात असत. गेल्या दोन दशकांत ही वादळे भारताच्या दिशेने येत आहेत. जागतिक तापमानवाढीमुळे समुद्राचे तापमान वाढत आहे. त्यामुळे मोठी चक्रीवादळे निर्माण होण्याचे प्रमाण वाढले आहे. या चक्रीवादळांमुळे देशाच्या पश्चिमी किनारपट्टीला धोका निर्माण झाला आहे. तारापूर आणि जैतापूरसारख्या अणुऊर्जा प्रकल्पांच्या ठिकाणी चक्रीवादळे धडकून भविष्यात मोठी दुर्घटना घडू शकते. याचबरोबर केरळमधील विळिंजम आणि गोव्यातील वास्को द गामा या बंदरांनाही चक्रीवादळांमुळे धोका निर्माण झालेला आहे.

केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाने कोळसा आयात करण्यासाठी वास्को द गामा बंदराची खोली न वाढविण्याची शिफारस केली होती. कोळसा जाळल्याने हवेतील प्रदूषकांचे प्रमाण वाढत असून, जगात भारतात हे प्रमाण अधिक आहे. या प्रदूषकांमुळे कमी कालावधीत जास्त पाऊस पडून त्यामुळ पूर येण्याचे आणि दरडी कोसळण्याचे प्रमाण वाढले आहे. केरळमधील वायनाडमध्येही हेच घडले. एका अभ्यासानुसार २०१० ते २०२० या कालावधीत दरडी कोसळण्याचे प्रमाण शंभर पटींनी वाढले आहे. ते भविष्यात आणखी वाढण्याचा अंदाज आहे, असे डॉ. गाडगीळ यांनी नमूद केले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

‘नमामि गंगे’नंतरही गंगा प्रदूषित

केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळ हे सातत्याने प्रदूषणाची आकडेवारी कमी दाखवत आहे. नमामि गंगा कार्यक्रम राबवूनही गंगा ही टोकाची प्रदूषित नदी बनली आहे. गंगेच्या काठावर सांडपाणी प्रकिया प्रकल्प आहेत; मात्र, ते चालविण्यासाठी वीज नाही. गंगेतील प्रदूषणामुळे माशांचा पुरवठा कमी झाला असून, तेथील कोळी समाजामध्ये बेरोजगारी वाढली आहे. त्यामुळे ते उपजीविकेसाठी ते वाळूउपसा करीत आहेत. महाराष्ट्रातील इंद्रायणी नदी कायम फेसाळलेली असते. त्याचे कारण शोधण्यासाठी आपण जपानी सल्लागारांना पैसे देत आहोत. जपानी सल्लागार आपल्या नदीतील समस्या आपल्यालाच सांगणार आहेत, असे डॉ. गाडगीळ यांनी स्पष्ट केले.