पुणे : पुण्याहून देशांतर्गतसह आंतरराष्ट्रीय आणि देशांतर्गत विमान उड्डाणांमध्ये आता आणखी वाढ झाली आहे. पुण्यातून बँकॉकसाठी थेट विमानसेवा नोव्हेंबरमध्ये सुरू झाली होती. यात आता आणखी एका आंतरराष्ट्रीय उड्डाणाची भर पडली आहे. यामुळे पुण्यातून होणाऱ्या आंतरराष्ट्रीय उड्डाणांची संख्या आता पाच झाली आहे.

पुणे विमानतळाने हिवाळी वेळापत्रकात या नवीन आंतरराष्ट्रीय उड्डाणांचे नियोजन केले होते. इंडिगो एअरलाइन्सने पुण्याहून बँकॉकसाठी थेट विमानसेवा गेल्या महिन्यात सुरू केली. याचबरोबर इंडिगोनेच पुणे ते दुबई थेट विमानसेवा सुरू केली आहे. आता एअर इंडिया एक्स्प्रेसने पुणे – बँकाक थेट विमानसेवा सुरु केली आहे. याचबरोबर एअर इंडिया एक्स्प्रेसने पुण्यातून मंगळुरूसाठी थेट विमानसेवा सुरु करण्याची घोषणाही केली आहे.

आणखी वाचा-पिंपरी : पुष्पवृष्टी, नगरप्रदक्षिणा, कीर्तन, महापूजा आणि महाप्रसादाने महोत्सवाची सांगता

एअर इंडिया एक्सप्रेसची पुणे बँकॉक सेवा गुरुवार शुक्रवार शनिवारी असेल. हे विमान पुण्यातून सकाळी ८.४० वाजता उड्डाण करेल आणि दुपारी २.३० वाजता बँकॉकमध्ये पोहोचेल. हे विमान बँकॉकमधून दुपारी ३.३५ वाजता उड्डाण करेल आणि पुण्यात सायंकाळी सहा ६.२५ वाजता पोहोचेल. याचबरोबर एअर इंडिया एक्सप्रेस पुणे मंगळूर ही थेट विमानसेवा ४ जानेवारीपासून सुरू करीत आहे. या मार्गावर दर शनिवारी दोन विमान फेऱ्या होणार आहेत.

आता पुण्यातून सिंगापूर, दुबई आणि बँकॉकसाठी थेट आंतरराष्ट्रीय विमानसेवेत आणखी वाढ झाली आहे. इंडिगेची पुण्यातून दुबईसाठी दररोज विमानसेवा सुरू आहे. हे विमान पुण्यातून सायंकाळी ५.४० वाजता निघून दुबईला रात्री १०.१० वाजता पोहोचते. दुबईतून हे विमान रात्री १२.१५ मिनिटांनी सुटते. इंडिगोची पुण्यातून बँकॉकसाठी आठवड्यातून तीन दिवस बुधवारी, शुक्रवारी आणि शनिवारी थेट विमानसेवा सुरू आहे. हे विमान पुण्यातून रात्री ११.१० वाजता सुटते आणि ते बँकॉकवरून रात्री १ वाजून १५ मिनिटांनी सुटते.

आणखी वाचा-वाकड पोलिसांनी चोरीला गेलेले १२० मोबाईल मूळ मालकांना केले परत…

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

तीन आंतरराष्ट्रीय ठिकाणी थेट उड्डाण

पुण्यातून आधी स्पाईसजेटकडून सिंगापूर आणि एअर इंडियाकडून (आधीची विस्तारा) दुबईसाठी थेट विमानसेवा सुरू होती. त्यात दुबईसाठी आणखी एक आणि बँकॉकसाठी दोन विमानांची भर पडली आहे. यामुळे पुणे तीन आंतरराष्ट्रीय ठिकाणांशी हवाई मार्गाने थेट जोडले गेले आहे. याचवेळी पुणे विमानतळावरील आंतरराष्ट्रीय उड्डाणांची संख्या पाचवर पोहोचली आहे.