पुणे : अवयव प्रत्यारोपणाबाबत घेतलेल्या एका निर्णयावरून पुण्यातील विभागीय अवयव प्रत्यारोपण समन्वय समिती (झेडटीसीसी) अडचणीत आली आहे. ओ रक्तगट असलेल्या व्यक्तीचे हृदय आणि फुफ्फुस हे बी रक्तगट असलेल्या व्यक्तीला देण्याचा निर्णय समितीने घेतला होता. याप्रकरणी राज्य अवयव व ऊती प्रत्यारोपण संस्थेने (सोट्टो) विभागीय समितीला कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. याप्रकरणी उत्तर देण्यास समितीला १५ दिवसांची मुदत देण्यात आली आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, एका मेंदूमृत व्यक्तीच्या हृदय आणि फुफ्फुसाचे दान करण्याबाबत विभागीय समितीने २ सप्टेंबरला निर्णय घेतला. या व्यक्तीचा रक्तगट ओ होता. त्याचे अवयव पुण्यातील स्थानिक बी रुग्णाला देण्यावर समितीने शिक्कामोर्तब केले होते. त्या वेळी राज्यातील इतर शहरांत हृदयाची तातडीने प्रत्यारोपणाची गरज असलेल्या ओ रक्तगटाच्या रुग्णांकडे दुर्लक्ष करण्यात आले. कारण ओ रक्तगटाच्या रुग्णांना दुसऱ्या रक्तगटाच्या दात्याचे अवयव चालत नाहीत. दुर्दैवाने या दात्याचे अवयव प्रत्यारोपणासाठी योग्य न ठरल्याने हे प्रत्यारोपण झाले नाही.

आणखी वाचा-रेल्वेची अशीही हुशारी! विजबिलात करणार लाखोंची बचत

सुरुवातीला ओ पॉझिटिव्ह दात्याचे हृदय मुंबईतील रुग्णाला देण्यात येणार होते; परंतु ऐनवेळी पुण्यातील रुग्णाची निवड करण्यात आली. या प्रकरणात विभागीय अवयव प्रत्यारोपण समितीने नियमांचे पालन केले नसल्याचा ठपका राज्य संस्थेने ठेवला आहे. याआधीही समितीने नियमांचे पालन न केल्याची उदाहरणे आहेत, असेही राज्य संस्थेने म्हटले असल्याचे सूत्रांनी सांगितले.

नियमानुसार निर्णय घेतल्याचा समितीचा दावा

पुण्यातील विभागीय प्रत्यारोपण समितीतील सदस्यांनी नाव न सांगण्याच्या अटीवर नोटीस मिळाल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला. त्यांनी सांगितले, की आम्ही नियमानुसार कार्यवाही केली आहे. एकाच वेळी दोन्ही अवयवांची आवश्यकता असलेल्या व्यक्तीला प्रत्यारोपण करण्यास मंजुरी देण्यात आलेली होती. त्यात कोणताही गैरप्रकार झालेला नाही. आम्ही नोटिशीला योग्य उत्तर देणार आहोत.