scorecardresearch

मार्चअखेरमुळे दस्तनोंदणीत अडथळे

नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागाकडून १ एप्रिल रोजी चालू बाजार मूल्यदर (रेडिरेकनर) जाहीर होणार आहेत.

पुणे : मार्चअखेरमुळे राज्यभरात मालमत्ता खरेदी-विक्री व्यवहारांची नोंदणी करण्यासाठी नोंदणी कार्यालयांमध्ये एकच झुंबड उडत आहे. राज्यात दररोज साडेआठ ते नऊ हजार एवढी होणारी दस्तनोंदणी सध्या १५ हजारांपेक्षा जास्त होत आहे. परिणामी सव्‍‌र्हरवर ताण येऊन तांत्रिक कारणांमुळे राज्यभरात सोमवारी दस्त नोंदणीत अडथळे आले. त्यामुळे वकील आणि नागरिकांना नाहक मनस्तापाला सामोरे जावे लागले.      

नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागाकडून १ एप्रिल रोजी चालू बाजार मूल्यदर (रेडिरेकनर) जाहीर होणार आहेत. रेडिरेकनरचे दर वाढण्याची शक्यता असल्याने सध्या दस्त नोंदणीसाठी दुय्यम निबंधक कार्यालयांत नागरिक गर्दी करत आहेत. तसेच मेट्रोची कामे सुरू असलेल्या ठिकाणी म्हणजेच मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (एमएमआरडीए), पुणे, पिंपरी-चिंचवड आणि नागपूर महापालिका या ठिकाणी मालमत्ता खरेदी-विक्री व्यवहारांवर एक टक्का मेट्रो अधिभार लागणार आहे. या कारणामुळे सध्या मालमत्ता खरेदी-विक्री व्यवहारांची नोंदणी करण्यासाठी दुय्यम निबंधक कार्यालयांत मोठय़ा प्रमाणात दस्त नोंदणी सुरू आहे. मात्र, दस्त नोंदणीतील अडथळय़ांमुळे वकील आणि पक्षकारांचा संपूर्ण दिवस याच कामासाठी खर्ची पडत आहे.

याबाबत बोलताना नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागाचे उपमहानिरीक्षक सुहास मापारी म्हणाले, ‘दस्त नोंदणी करताना सव्‍‌र्हरला तांत्रिक अडचणी येत असल्याची बाब खरी आहे. याबाबत विभागाकडून विविध उपाययोजना करण्यात येत आहेत. मात्र, मार्चअखेरमुळे सध्या राज्यात दररोज होणारी दस्त नोंदणी दुपटीने वाढली आहे. शनिवारी (२६ मार्च) एकाच दिवसांत राज्यात तब्बल १५ हजार एवढे दस्त नोंद झाले आहेत. त्यामुळे सव्‍‌र्हरवर अतिरिक्त ताण येत असल्याने दस्त नोंदणीत अडथळे येत आहेत. तांत्रिक अडचणी येऊ नयेत, म्हणून अतिरिक्त कर्मचाऱ्यांची नेमणूक केली आहे.’      

दरम्यान, गेल्या आठवडय़ात २४ मार्च रोजी देखील सव्‍‌र्हर डाउनमुळे दस्त नोंदणीत अडथळे आले होते. तसेच सोमवारी (२८ मार्च) मार्चअखेरमुळे मोठय़ा प्रमाणात दस्त नोंदणी होत असल्याने सव्‍‌र्हरमध्ये तांत्रिक बिघाड होऊन दस्त नोंदणीत अडथळे निर्माण झाले आहेत.

मराठीतील सर्व पुणे ( Pune ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Obstacles in property purchase and sale registration due to march end zws