लोकसत्ता प्रतिनिधी

पुणे : गेल्या काही महिन्यांपासून पीएमपीतील प्रवासी महिलांकडील दागिने चोरून नेण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. सातारा रस्त्यावर पीएमपी प्रवासी ज्येष्ठ महिलेच्या हातातील बांगडी चोरट्यांनी कटरने कापले. गर्दीत बांगडी कापणाऱ्या चोरट्याला ज्येष्ठ महिलेने पकडले. त्यांनी आरडाओरडा केल्यानंतर प्रवाशांनी चोरट्याला पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले. चोरट्याबरोबर असलेले साथीदार पसार झाले असून, पोलिसांकडून त्यांचा शोध घेण्यात येत आहे.

या बाबत एका ७२ वर्षीय ज्येष्ठ महिलेने सहकारनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तक्रारादार ज्येष्ठ ‌महिला जांभुळवाडी परिसरात राहायला आहेत. त्या स्वारगेट ते जांभुळवाडी या मार्गावरील पीएमपी बसमधून प्रवास करत होत्या. बसमध्ये गर्दी होती. चोरटे बसमधील शिरले होते. ज्येष्ठ महिलेला बसमध्ये जागा मिळाली नव्हती. त्यामुळे त्या उभ्या होत्या. चोरट्यांनी गर्दीत ज्येष्ठ महिलेच्या हातातील ४० हजारांची सोन्याची बांगडी कटरने कापली. त्यानंतर तो पसार होण्याच्या तयारीत असताना ज्येष्ठ महिलेने पाहिले. त्यांनी आरडाओरडा केला. चोरटा आणि साथीदार बस थांब्यावर उतरले.

आणखी वाचा-“हा तर भाजपाचा राजकीय सोहळा”, राम मंदिरावरून संजय राऊतांची टीका; म्हणाले, “हा सोहळा होऊद्या, मग..”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

ज्येष्ठ महिलेचा आरडाओरडा प्रवाशांनी ऐकला. पद्मावती परिसरात प्रवासी आणि नागिरकांनी पाठलाग करुन चोरटा चांदबाबू अलीहुसेन शेख (वय ३०, रा. बेचाळीस चौक, कोंढवा खुर्द) याला पकडले. त्याला पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. शेखला पोलिसांनी अटक केली असून, त्याच्याबरोबर असलेल्या साथीदारांचा शोध घेण्यात येत आहे. पोलीस उपनिरीक्षक राहुल खंडाळे तपास करत आहेत.