आम्ही परस्परांचा कायदेशीर पती-पत्नी म्हणून स्वीकार करीत आहोत.. अशी शपथ घेत पूर्वी प्रेमाच्या आणाभाका घेतलेल्या युवक-युवतींनी शुक्रवारी एकमेकांच्या गळ्यामध्ये वरमाला घातली. ‘जुळून येती रेशीमगाठी’ असे म्हणत विवाह नोंदणी कार्यालयामध्ये ‘व्हॅलेंटाईन डे’च्या मुहूर्तावर ६४ प्रेमवीर जीवनाच्या जोडीदारामध्ये बांधले गेले.
एकमेकांवर प्रेम करणाऱ्या युवक-युवतींची आणि नातेवाइकांची लगबग.. नव्याने विवाह करणाऱ्या जोडप्याच्या कागदपत्रांची पूर्तता करून घेण्यासाठी वकिलांची सुरू असलेली लगीनघाई.. विवाह नोंदणी अधिकाऱ्यासमोर रजिस्टरवर स्वाक्षरी करीत नातेसंबंधावर केलेले शिक्कामोर्तब.. नातेवाइकांच्या गर्दीने फुललेला परिसर.. हे दृश्य होते जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारातील विवाह नोंदणी कार्यालय परिसरातील! याबाबत विवाह नोंदणी अधिकारी सुहास गायकवाड यांनी सांगितले की, व्हॅलेंटाईन डे च्या मुहूर्तावर विवाहबद्ध होण्यासंदर्भात अनेकांनी पूर्वनोंदणी केली होती. ही नोंदणी सुमारे महिनाभर आधीच करावी लागते. शुक्रवारी या मुहुर्तावर ६४ वधु-वरांनी विवाहाची नोंदणी केली. इतर दिवशी दररोज साधारणपणे १०-१५ विवाह होत असात. व्हॅलेंटाईन डे निमित्त शुक्रवारी त्यात लक्षणीय वाढ झाली.
स्वप्नील साळवे आणि आरती चव्हाण यांनीही शुक्रवारी विवाहनोंदणी केली. ते दोघेही पुणे स्टेशनजवळील एका कंपनीमध्ये नोकरीस आहेत. स्वप्नील कोंढव्याला राहतो. तर, आरती दत्तवाडी येथे वास्तव्यास आहे. ते दोन वर्षांपासून एकत्र काम करत आहेत. ‘‘परिचयाचे रूपांतर प्रेमामध्ये कधी झाले हे त्यांनाही कळले नाही. आमच्या दोघांच्याही घरातून या विवाहाला पाठिंबा असल्याचे स्वप्नील याने सांगितले. जोडीदार होण्यासाठी व्हॅलेंटाईन डे हा मुहूर्त चांगला या भावनेतून आम्ही विवाहबद्ध झालो,’’ असे आरती हिने सांगितले.
आनंदाचं ‘क्रेडिट कार्ड’
इंटरनेटच्या जाळ्यातून सागर कोकणे आणि प्रिया शिंदे प्रेमाच्या जाळ्यात सापडले. ‘नव जीवन बँके’चे ‘आनंदाचं क्रेडिट कार्ड’ अशा अभिनव पत्रिकेच्या माध्यमातून ते शुक्रवारी विवाहबद्ध झाले. सागर हा दुबई येथे फायबर ग्लासचा व्यवसाय करतो. तर, प्रिया मूळची साताऱ्याची. ती सध्या मुंबई येथे फॅशन डिझायनर आहे. त्यांची सहा वर्षांपूर्वी इंटरनेटच्या माध्यमातून ओळख झाली. त्यानंतर ‘चॅटिंग’च्या माध्यमातून त्यांच्यातील धागे जुळले आणि व्हॅलेटाईन डे हा मुहूर्त साधून ते विवाहबद्ध झाले, असे सागरचे आजोबा किसनराव डुंबरे यांनी सांगितले.  वधू-वरांमध्ये दोघांच्या मामांनी धरलेला आंतरपाट, मोबाईलमध्ये सेव्ह केलेली मंगलाष्टके, नातेवाइकांनी अक्षता टाकून दिलेले शुभाशीर्वाद अशा वातावरणात कार्यालयाजवळील पारापाशी असलेल्या अक्कलकोट स्वामी समर्थ मंदिर परिसरामध्ये त्यांनी पारंपरिक पद्धतीनेही विवाह केला.