लोकसत्ता प्रतिनिधी
पिंपरी : करदात्यांच्या मालमत्ताकराबाबत शंका, प्रश्न व अडचणींचा निपटारा करण्यासाठी पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेने सुरू केलेल्या ‘करसंवाद’ला नागरिकांचा प्रतिसाद मिळत आहे. करदात्यांना जूनअखेरच्या सवलतींची माहिती मिळण्यासाठी आयोजित केलेल्या करसंवादात करदात्यांनी ‘ऑनलाइन’ व ‘ऑफलाइन’ पद्धतीने सहभाग घेतला. नागरिकांच्या प्रश्नांचा जागेवरच निपटारा करण्यात आला.
करदात्यांचे प्रश्न ऐकून त्यावर तातडीचा निपटारा, निरसन करून त्याबाबत अधिकाऱ्यांना आदेश देऊन नागरिकांचा विभागाबाबत विश्वास निर्माण करण्याचे काम ‘करसंवाद’ उपक्रमाने केले आहे. नुकत्याच झालेल्या करसंवादमध्ये ४० पेक्षा जास्त नागरिकांनी ऑनलाइन व ३० पेक्षा जास्त नागरिकांनी विभागामध्ये येऊन विचारलेल्या प्रश्नाचे करसंकलन विभागाचे सहाय्यक आयुक्त नीलेश देशमुख यांनी निरसन केले.
आणखी वाचा- पिंपरीतील ५२ ‘रूफ टॉप’ हॉटेल रडारवर
उपयोगकर्ता शुल्क कशासाठी ?अवैध बांधकाम शास्ती समायोजन कधीपासून? सामान्य करातील सवलती कोणाला व किती? विलंब शुल्क कधी पासून? अशा अनेक प्रश्नांचे निरसन करण्यात आले. त्याचबरोबर नागरिकांनी दिलेल्या सूचनांची नोंद घेऊन त्याबाबत अधिकाऱ्यांना आदेश देण्यात आले.
‘ऑनलाइन’ माध्यमातून सहभागी झालेल्या प्रत्येक प्रश्नास देशमुख यांनी उत्तर देताना, सामान्य करात आगाऊ भरणा केल्यास पाच टक्के, ‘ऑनलाइन’ कराचा भरणा केल्यास पाच टक्के, महिलांच्या नावे असणाऱ्या एका निवासी मालमत्तेस ३० टक्के, दिव्यांग ५० टक्के, माजी सैनिकांना १०० टक्के, सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प, खत निर्मिती यंत्रणा असलेल्या सोसायट्यांना पाच टक्के या सवलती असून, जूनअखेर मालमत्ताकराचा भरणा करण्याचे आवाहनही केले.
आणखी वाचा-पुणे: कर्नाटकातील तोतया लष्करी अधिकारी पोलिसांच्या जाळ्यात
प्रतिमहा दोन टक्के विलंब शुल्क
‘उपयोगकर्ता शुल्क’ हे नागरिकांची पिळवणूक नसून, सरकारच्या आदेशानुसार नागरिकांना कचरा संकलन व विलगीकरण यासाठी मिळणाऱ्या सेवेसाठीचे शुल्क आहे. जूनअखेर मालमत्ताकराचा भरणा न केल्यास जप्ती मोहिमेला थकबाकीदारांना सामोरे जावे लागेल. त्याचबरोबर थकबाकीदारांना येत्या काळात प्रतिमहा दोन टक्क्यांचे विलंब शुल्क आकारण्यात येणार असल्याचेही सहाय्यक आयुक्त देशमुख यांनी सांगितले.