आखाती देशातून सोन्याची तस्करी करणाऱ्या महिलेला केंद्रीय सीमाशुल्क विभागाने पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळावर पकडले. महिलेकडून ९८ लाख ८३ हजार रुपये किमतीचे ३ किलो ४१ ग्रॅम सोने जप्त करण्यात आले.

रेहाना फैझान अहमद खान (रा. कुर्ला, मुंबई) असे अटक केलेल्या महिलेचे नाव आहे.  रेहाना गुरुवारी पहाटे विमानतळावर उतरली. दुबईहून आलेल्या प्रवाशांची सीमाशुल्क विभागाच्या पथकाकडून तपासणी करण्यात येत होती. त्या वेळी रेहानाच्या संशयास्पद हालचाली सीमाशुल्क विभागाच्या पथकाने टिपल्या आणि तिची चौकशी सुरू करण्यात आली. रेहानाने अंतर्वस्त्रात सोने लपविल्याचे उघड झाले. रेहानाने शाहीन नावाच्या व्यक्तीने दुबईत सोने दिले असल्याची माहिती दिली. पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या परिसरात एक व्यक्ती सोने घेण्यासाठी येणार असल्याचे तिने सांगितले. दरम्यान, सीमाशुल्क विभागाच्या अमली पदार्थविरोधी पथकाने लष्कर भागात अमली पदार्थ विक्री प्रकरणात एकाला अटक केली.

कसबा पेठेत घरफोडी

सदनिकेचा दरवाजा तोडून चोरटय़ांनी कपाटातील रोकड आणि दागिने असा ५ लाख ४२ हजार रुपयांचा ऐवज लांबविल्याची घटना घडली.  मंगेश कोतवाल (वय ३५,रा. मोरेश्वर निवास सोसायटी, कसबा पेठ) यांनी यासंदर्भात फरासखाना पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

कोतवाल हे सहकुटुंब देवदर्शनासाठी बाहेरगावी गेले होते. चोरटय़ांनी सदनिकेचा दरवाजा तोडून शयनगृहात प्रवेश केला. कपाट उचकटून  ऐवज लांबविल्याची घटना गुरुवारी रात्री उघडकीस आली. पोलीस उपनिरीक्षक जी. डी. नाईक तपास करत आहेत.

आंबा विक्रेत्याला लुटले

आंबा विक्रेत्याला तीक्ष्ण शस्त्राचा धाक दाखवून पंधरा हजारांची रोकड आणि मोबाइल संच असा बावीस हजारांचा ऐवज चोरटय़ांनी लुटून नेल्याची घटना हिंजवडी भागात घडली.  आंबा विक्रेता फिटु शेख (वय ३०, रा. हिंजवडी-वाकड रस्ता, मूळ रा. उत्तर प्रदेश) याने हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. शेखने दिलेल्या फिर्यादीनुसार तीन चोरटय़ांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हिंजवडी-वाकड रस्त्यावरील एका दुकानात शेखने आंबा विक्री सुरू केली आहे. काही दिवसांपूर्वी तीन चोरटे रात्री शेख याच्या दुकानात शिरले. त्यांना कोयत्याचा धाक दाखवून पंधरा हजारांची रोकड आणि मोबाइल संच असा ऐवज लुटून नेला.सहायक पोलीस निरीक्षक जी. जे. धामणे तपास करत आहेत.

तीन दुकाने फोम्डली

येरवडा भागात तीन दुकानांचे कुलूप तोडून चोरटय़ांनी रोकड लांबविल्याची घटना उघडकीस आली आहे.  शमीन शेख (वय ४०,रा. येरवडा) यांनी फिर्याद दिली आहे. शेख यांचे विमानतळ रस्त्यावर नागपूर चाळ भागात हॉटेल आहे. चोरटय़ांनी मध्यरात्री हॉटेलच्या दरवाज्याचे कुलूप तोडले. गल्ल्यातील सात हजारांची रोकड चोरली.

शेजारी असलेले प्रेम ओमप्रकाश गुप्ता यांचे जनरल स्टोअर्स आणि ढगळराम चौधरी यांच्या किराणामाल विक्रीच्या दुकानाचे कुलूप तोडून चोरटय़ांनी रोकड लांबविली. चोरटय़ांनी तीन दुकानातून एकू ण मिळून बारा हजारांची रोकड चोरून नेली.