पुणे : सरकारी रुग्णालयातील परिचारिकांनी गुरुवारी (ता. १४) संप पुकारल्याने ससून सर्वोपचार रुग्णालयाला मोठा फटका बसला. ससूनमध्ये दररोज सरासरी ४० शस्त्रक्रिया होतात. मात्र, ६०० परिचारिका संपावर गेल्याने केवळ आठ शस्त्रक्रिया होऊ शकल्या. केवळ तातडीने करावयाच्या शस्त्रक्रिया दिवसभरात करण्यात आल्या आणि नियोजित शस्त्रक्रिया पुढे ढकलण्यात आल्या, अशी माहिती सूत्रांनी दिली.

महाराष्ट्र गव्हर्नमेंट नर्सेस असोसिएशन पुणेच्या वतीने हा संप करण्यात आला. परिचारिकांची पदे तातडीने भरावीत, बक्षी समिती खंड २ मध्ये परिचारिकांवर झालेला वेतन त्रुटीचा अन्याय दूर करावा, सेवा निवृत्तीचे वय ६० वर्षे करावे आणि खासगीकरण, कंत्राटीकरणाचे धोरण रद्द करावे, अशा परिचारिकांच्या मागण्या आहेत. या संपात ससून रुग्णालयातील सुमारे ६०० परिचारिका सहभागी झाल्या, अशी माहिती असोसिएशनच्या कार्याध्यक्षा प्रज्ञा गायकवाड यांनी दिली.

हेही वाचा >>> एटीएसने नारायणगावात आठ बांगलादेशी नागरिकांना पकडले

ससूनमधील नर्सिंग महाविद्यालयासह खासगी नर्सिंग महाविद्यालयातील २०४ विद्यार्थ्यांना पाचारण करण्यात आले. त्यात ससूनच्या नर्सिंग महाविद्यालय ११८, सिम्बायोसिस नर्सिंग महाविद्यालय १४, भारती विद्यापीठ ६३ आणि एमआयएनएच ससूनमधील ९ विद्यार्थ्यांचा समावेश होता. ससून रुग्णालयातील रुग्णव्यवस्था कोलमडून पडू नये, यासाठी प्रशासनाने हे पाऊल उचलले. ससून रुग्णालयात दररोज सुमारे ४० शस्त्रक्रिया होतात. मात्र, परिचारिकांच्या संपामुळे केवळ आठच शस्त्रक्रिया होऊ शकल्या. या सर्व शस्त्रक्रिया तातडीच्या होत्या. हा संप संध्याकाळी स्थगित झाल्याने रात्री काही शस्त्रक्रिया केल्या जातील, अशी माहिती रुग्णालयातील सूत्रांनी दिली.

जिल्हा रुग्णालयावरही संपाचा परिणाम

औंध येथील जिल्हा सरकारी रुग्णालयातील परिचारिकाही संपात सहभागी झाल्या होत्या. नर्सिंग महाविद्यालयातील विद्यार्थ्यांची मदत घेण्यात आली. त्या जिल्हा रुग्णालयातील ३० प्रशिक्षणार्थी परिचारिका आणि सिम्बायोसिस नर्सिग महाविद्यालयातील ३० विद्यार्थ्यांचा समावेश होता. त्यामुळे रुग्णसेवेवर फारसा परिणाम झाला नाही. केवळ तातडीच्या शस्त्रक्रिया आज करण्यात आल्या. नियोजित शस्त्रक्रिया पुढे ढकलण्यात आल्या आहेत, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. नागनाथ येमपल्ले यांनी दिली.

हेही वाचा >>> ‘आरटीओ’तील खोळंबा! कर्मचारी संपावर, अधिकारी कामावर अन् नागरिकांची गैरसोय

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

ससून रुग्णालयासह जिल्ह्यातील सरकारी रुग्णालयांतील सुमारे एक हजार परिचारिकांनी संपात सहभाग घेतला. सरकारने आमचे म्हणणे पोहोचविण्यासाठी आम्हाला हे पाऊल उचलावे लागले. रुग्णव्यवस्थेवर परिणाम होऊ नये, यासाठी प्रशासनाला विद्यार्थी परिचारिकांची मदत घ्यावी लागली. – रेखा थिटे, अध्यक्षा, महाराष्ट्र गव्हर्नमेंट नर्सेस असोसिएशन पुणे</p>