“राज्यात सत्तांतर होण्यापूर्वी जो घटनाक्रम झाल्याचे दिसून येते, ते सर्व पाहता कुठंतरी पाणी मुरतंय आणि नक्कीच काहीतरी गडबड झाली आहे, हे त्रिवार सत्य आहे.”, अशी सूचक टिप्पणी विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी खेड येथे बोलताना केली. तसेच, “फोडाफोडी करून जे मिळवले आहे, ते औट घटकेचे आहे, हे लवकरच मुख्यमंत्र्यांना कळेल.”, असेही ते म्हणाले.

खेड तालुका राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने आयोजित कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात पवार बोलत होते. राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर, आमदार दिलीप मोहिते, अतुल बेनके, माजी आमदार रामभाऊ कांडगे यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

…हे फडणवीसांच्या पत्नीनेच उघड केले –

कुठतरी पाणी मुरते आहे, हे सांगताना पवार म्हणाले की, “१५ दिवसांत शिवसेना आमदारांनी त्यांची भूमिका बदलली. ते रडीचा डाव खेळले. सुरूवातीला म्हणाले आमचा दुरान्वये संबंध नाही. काय चालले आहे, हे आम्हालाच माहिती नाही. नंतर हे सगळे सूरतला पोचले. तेथे त्यांना कडेकोट बंदोबस्त कसा मिळाला? गुजरात सरकारने संरक्षण देऊन त्यांची बडदास्त का ठेवली? नंतर ते गुवाहाटीला कशाप्रकारे गेले. तेथे त्यांना कसा बंदोबस्त मिळाला. तिथून ते गोव्याला गेले. तिथेही बंदोबस्त मिळाला. या तीनही ठिकाणी कोणाची सरकारे होती? एकीकडे ते फोडाफोडी करत होते, तर दुसरीकडे आमचा काही संबंध नसल्याचा दावा करत होते. अशातच देवेंद्र फडणवीस वेष बदलून घराबाहेर जायचे, हे त्यांच्या पत्नीनेच उघड केले. फोडाफोडी करून ज्यांनी सत्ता मिळवली. ती औटघटकेची आहे, हे लवकरच त्यांना कळेल.”

नव्याचे नऊ दिवस अजून संपायचे आहेत –

याचबरोबर, “आताच मुख्यमंत्र्यांचा माईक ओढला जातो. कागद लिहून काय बोलायचे ते त्यांना सांगितले जाते. ही तर सुरूवात आहे. नव्याचे नऊ दिवस अजून संपायचे आहेत. पुढे मुख्यमंत्र्यांना बरेच काही पहावे लागणार आहे. पक्षांतर केलेले नेते जनतेला आवडत नाही. पुढच्या वेळी मतदार त्यांना नाकारतात, हे यापूर्वी अनेकदा दिसून आलेले आहे, हे त्यांनी लक्षात ठेवावे.” असंही अजित पवारांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना उद्देशून म्हटलं.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

हे राजकारण फार काळ टिकणारे नाही –

पवार म्हणाले, “सध्या राज्यात काहीही चाललेले आहे. आपण लोकशाही मानणारे आहोत. मात्र, राज्यात सध्या लोकशाहीची थट्टा सुरू आहे. लोकशाहीचा खून केला जात आहे. पक्षांतर बंदी कायद्याला वाटाण्याच्या अक्षता लावण्यात आल्या आहेत. असे यापूर्वी महाराष्ट्रात आणि देशातही घडले नव्हते. सत्ता येत असते, जात असते. सत्तेचा ताम्रपट घेऊन कोणी आलेला नाही. जनता काय तो निर्णय घेत असते. ज्या पध्दतीने उध्दव ठाकरे यांना मुख्यमंत्रीपदावरून घालवले. राष्ट्रवादी काँग्रेसला बदनाम करण्याचा प्रयत्न करण्यात आला. हे राजकारण फार काळ टिकणारे नाही. सर्व घडामोडींकडे मतदारांचे लक्ष असते. मतदानाच्या दिवशी ते योग्य निर्णय घेत असतात. कालपर्यंत आम्ही सत्तेत होतो. आता एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले. मात्र, त्यांच्या मंत्रिमंडळाचा विस्तार का होत नाही? याचे उत्तर त्यांनाच माहिती आहे. मंत्री, पालकमंत्री नेमले असते तर सध्याच्या संकटाच्या काळात त्यांनी आपआपल्या भागाचा आढावा घेतला असता. जिल्हाधिकारी, मुख्याधिकाऱ्यांना सूचना देऊन आवश्यक कार्यवाही झाली असती. राज्यात ३६ जिल्हे आहेत. त्या सर्व ठिकाणी काम सुरू झाले असते. मात्र, मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्री दोघेच मालक झाले आहेत. मंत्रीमंडळाचा विस्तार करून बाकीच्या आमदारांना का सामावून घेतले जात नाहीत? मंत्रीमंडळात आणखी ४० जण घेता येऊ शकतात. मात्र, त्यांची वर्णी लागताना दिसत नाही. याकडे देखील अजित पवारांनी लक्ष वेधले.