पुणे : पुणे महापालिकेच्या हडपसरमधील रामटेकडी येथील प्रस्तावित कचरा प्रकल्पाला हडपसर भागातील माजी नगरसेवक योगेश ससाणे यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी विरोध केला आहे. हा प्रकल्प लादण्याचा प्रयत्न केल्यास त्या विरोधात रस्त्यावर उतरून आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे.

माजी नगरसेवक ससाणे यांच्यासह पक्षाचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप, बंडू गायकवाड, नीलेश मगर यांनी महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांची भेट घेऊन प्रकल्प न करण्याची मागणी केली. त्या संदर्भात निवेदनही दिले. महापालिकेने रामटेकडी येथे ७५ टन क्षमतेचा नवीन कचरा प्रक्रिया प्रकल्प प्रस्तावित केला आहे. या प्रकल्पात जुने फर्निचर, गाद्या, चिंध्या, उशा या कचऱ्यावर प्रक्रिया होणार आहे. महापालिकेचे तत्कालीन आयुक्त डॉ. राजेंद्र भोसले यांनी त्यांच्या कार्यकाळात झालेल्या शेवटच्या स्थायी समितीच्या बैठकीत हा विषय मांडून त्याला मान्यता देण्यात आली. हा प्रकल्प १५ वर्षांसाठी खासगी संस्थेला देण्यात येणार आहे. त्यासाठी महापालिका सुमारे ६६ कोटी रुपये खर्च करणार आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

‘जागेचे संपादन न करता घाईघाईने हा प्रकल्प मंजूर करण्यात आला. हडपसर, मुंढवा, उरुळी देवाची, हांडेवाडी रस्ता आणि हडपसर औद्योगिक वसाहत येथे महापालिकेने यापूर्वीच कचरा प्रकल्प उभारले आहेत. त्यामुळे या भागातील पाच लाखांहून अधिक नागरिकांचे आरोग्य धोक्यात आहे. हा प्रकल्प येथील रहिवाशांवर अन्याय करणारा असून, तो रद्द करावा. अन्यथा, तीव्र आंदोलन करण्यात येईल,’ असे ससाणे म्हणाले.