सहायक प्राध्यापक पदासाठी घेतल्या जाणाऱ्या राज्य पात्रता परीक्षेच्या (सेट) धर्तीवर राज्यातील अंतिम वर्षांच्या विद्यार्थ्यांची केंद्रीय पद्धतीने परीक्षा घेणे शक्य आहे. राज्यातील सर्व विद्यापीठांच्या विद्यार्थ्यांसाठी विद्याशाखानिहाय एकच बहुपर्यायी प्रश्नपत्रिका तयार करून ही परीक्षा घेतली जाऊ शकते. केंद्रीय पद्धतीमुळे कोणत्याही विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांना जवळच्या केंद्रावरून ही परीक्षा देणे शक्य होईल, असे शिक्षण वर्तुळातील सूत्रांचे मत आहे.

करोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अंतिम वर्षांच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय जाहीर केला. मात्र, राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी त्याबाबत नाराजी व्यक्त करत विद्यापीठ कायद्यानुसार परीक्षा घेण्याची ठाम भूमिका मांडली. त्यामुळे अंतिम वर्षांच्या परीक्षांचा पेच निर्माण झाला आहे. या घडामोडींना आता पंधरा दिवस होत आले, तरी परीक्षांच्या निर्णयाचे घोंगडे अद्याप भिजत पडले आहे.

राज्यातील विद्यापीठांच्या कुलगुरूंच्या बैठकीत ‘सेट’ परीक्षेच्या धर्तीवर केंद्रीय पद्धतीने परीक्षा घेण्याबाबत चर्चा झाली होती. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातर्फे सेट ही परीक्षा महाराष्ट्र आणि गोवा या राज्यांमध्ये घेतली जाते. सध्याच्या करोना संसर्गाच्या काळात अंतिम वर्षांच्या विद्यार्थ्यांची प्रत्येक विषयाची स्वतंत्र परीक्षा घेण्याऐवजी एकच बहुपर्यायी प्रश्नपत्रिका असलेली केंद्रीय पद्धत सोपी आणि उपयुक्त ठरू शकते. सर्व विद्यार्थ्यांसाठी एकच परीक्षा घेऊन विद्यार्थ्यांना त्यांची पदवी त्यांच्याच विद्यापीठाकडून देता येऊ शकते. मात्र, या पर्यायाचा सर्व बाजूने विचार करण्यापूर्वीच शासनाकडून परीक्षा रद्दचा निर्णय घेण्यात आल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले.

  निर्णय राज्यपालांकडे..

केंद्रीय पद्धतीने परीक्षा घेण्याचा पर्याय राज्य शासनाला अद्यापही खुला आहे. या पद्धतीने परीक्षा घेण्याबाबत राज्यपाल निर्णय घेऊ शकतात, अशी माहिती देण्यात आली.

उपयुक्तता कशी?

* राज्यातील विद्यापीठांचे अंतिम वर्षांचे अभ्यासक्रम वेगळे असले, तरी त्यात विद्यापीठ अनुदान आयोगाच्या (यूजीसी) धोरणानुसार ७० टक्के साम्य आहे. त्यामुळे सर्व विषयांचा समावेश असलेली एकच बहुपर्यायी प्रश्नपत्रिका तयार करणे शक्य आहे.

* राज्यातील अंतिम वर्षांच्या विद्यार्थ्यांची एकाच वेळी परीक्षा घेता येऊ शकते. या प्रश्नपत्रिकेत सर्व विषयांचा समावेश असल्याने विद्यार्थ्यांना प्रत्येक विषयाची स्वतंत्र परीक्षा द्यावी लागणार नाही.

* प्रश्नपत्रिकेवरील बारकोड आणि ओएमआर पद्धतीमुळे या परीक्षेचा निकाल लवकर जाहीर करता येऊ शकतो.

* सर्व विद्यापीठांकडे तयार असलेल्या अंतिम वर्ष परीक्षांसाठीच्या प्रश्नपत्रिकांचा वापर करून पंधरा ते वीस दिवसांत केंद्रीय परीक्षेसाठीची प्रश्नपत्रिका तयार केली जाऊ शकते. त्यात किमान काठिण्यपातळीही राखली जाईल.

* परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना त्यांची नोंदणी असलेल्या महाविद्यालयात किंवा विद्यापीठात जाण्याची गरज नाही. नजीकच्या केंद्रावरूनही ते परीक्षा देऊ शकतात.