लोकसत्ता प्रतिनिधी
पुणे : शहरातील विविध भागांमध्ये रस्त्यांवर तसेच पदपथांवर बेकायदा पद्धतीने फटाके विक्रीची दुकाने थाटण्यात आली आहेत. सिंहगड रस्ता, सहकारनगर, वारजे यांसह अनेक भागांत हे चित्र असून, ही अतिक्रमणे तातडीने दूर करून त्याचा अहवाल सादर करावा, असे आदेश पालिकेचे अतिरिक्त आयुक्त पृथ्वीराज बी. पी. यांनी दिले आहेत.
शहरातील नागरिकांच्या सुरक्षिततेचा कोणताही विचार न करता अनेक भागांत दिवाळीसाठी बेकायदा पद्धतीने फटाक्यांचे स्टॉल उभारून विक्री केली जात आहे. दिवाळीच्या काळात फटाका विक्री करण्यासाठी महापालिकेच्या वतीने लिलाव करून स्टॉल उपलब्ध करून दिले जातात. महापालिकेच्या १५ क्षेत्रीय कार्यालयांमध्ये असलेल्या जागांचा लिलाव करून हे स्टॉल दिले जातात. यंदा शनिवार पेठेतील वर्तक उद्यान वगळून अन्य कोणत्याही ठिकाणी फटाक्यांच्या स्टॉलला महापालिकेला फारसा प्रतिसाद मिळालेला नाही. मात्र, दुसरीकडे शहराच्या सर्वच भागांतील रस्त्यांवर सर्रास पत्र्याचे शेड उभारून फाटके विक्रीची दुकाने थाटण्यात आली आहे. पालिकेची कोणतीही परवनागी न घेता हे स्टॉल उभारण्यात आले आहेत.
आणखी वाचा-पक्षातील बंडखोरीचे काँग्रेस समोर आव्हान!
रस्त्यांवर तसेच फूटपाथवर हे बेकायदा स्टॉल उभारताना सुरक्षिततेच्या नियमांचे पालन केले आहे की नाही, याची माहितीदेखील महापालिकेकडे उपलब्ध नाही. वडगाव शेरी, धानोरी, धायरी, सिंहगड रस्ता, कात्रज-कोंढवा रस्ता, बिबवेवाडी, कोथरूड, या परिसरात हे स्टॉल गेल्या पाच ते सहा दिवसांपासून सुरू झाले आहेत. त्यामुळे रस्त्यावर वाहतूक कोंडी होत आहे. शिवाय नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्नही समोर आला आहे.
सिंहगड रस्त्यावर पादचारी मार्गावर अनेक दुकाने उभारून फाटकेविक्री सुरू असल्याचा प्रकार अतिरिक्त आयुक्त पृथ्वीराज बी. पी. यांच्या निदर्शनास आणून दिल्यानंतर त्यांनी नागरिकांच्या सुरक्षेस प्राधान्य देऊन कारवाई करण्याचे आदेश अतिक्रमण विभागाला दिले.
आणखी वाचा-देखभाल, दुरुस्ती जमत नसेल, तर सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याचा हट्ट का?
कारवाईवर राजकीय दबाव?
स्थानिक राजकीय नेत्यांना हाताशी धरून ही फटाक्यांची दुकाने सुरू केली जातात, तर काही ठिकाणी अतिक्रमण विभागाच्या कर्मचाऱ्यांच्या आशीर्वादाने दुकाने थाटण्यात आली आहेत, असाही आरोप केला जात आहे.
रस्त्यावर, पादचारी मार्गावर बेकायदा पद्धतीने फाटके विक्रीची दुकाने उभारणे चुकीचे आहे. यामुळे नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. यावर कारवाई करण्याच्या सूचना अतिक्रमण विभागाला दिल्या आहेत. -पृथ्वीराज बी. पी., अतिरिक्त आयुक्त, महापालिका