शहरांमध्ये विशेषत: महानगरांमध्ये कचरा व्यवस्थापनाचे गणित अत्यंत विस्कळीत झाले आहे. त्यावर उपाय शोधण्याच्या कल्पनेतून तीन वेगवेगळ्या क्षेत्रांतील तरुणांनी पदवीचे शिक्षण घेतल्यानंतर एकत्र येत नोकरीऐवजी सेंद्रिय उत्पादनांचा व्यवसाय सुरू केला. सेंद्रिय पॉटिंग मिक्स आणि सेंद्रिय कंपोस्ट अशा सेंद्रिय उत्पादनांबरोबरच गार्डन डेव्हलपमेंट, ग्रीन वॉल, किचन गार्डन सेवा आणि त्याबाबत मार्गदर्शन असेही काम हे तिघे करतात. पुण्याबरोबरच बेंगळुरूसारख्या मोठय़ा शहरांमधूनही त्यांच्या उत्पादनांना मागणी आहे. उत्पादने आणि सेवा देणाऱ्या कंपनीच्या माध्यमातून सामाजिक भान जपत स्वस्त, शाश्वत व नावीन्यपूर्णतेतून सामाजिक आणि आर्थिक विकास साधण्याचे उद्दिष्ट त्यांनी ठेवले आहे.

अनुपमा मडकेकर, रवींद्र गायकवाड आणि नितीन रंगदाळ यांनी जानेवारी २०१६ मध्ये अनंत रिन्युएबल्स प्रा. लि. कंपनीची रीतसर नोंद केली. अनुपमा आणि रवींद्र यांच्या नावाने या कंपनीची नोंद आहे. मात्र, १ सप्टेंबर २०१५ पासूनच या तिघांनी प्रत्यक्ष कामाला सुरुवात केली. ही उत्पादन आणि सेवा देणारी कंपनी आहे. हे तिघेही लहानपणापासून एकमेकांचे शेजारी आहेत. आपापल्या क्षेत्रातील पदवीचे शिक्षण पूर्ण झाल्यानंतर व्यवसाय करायचा असे त्यांनी ठरवले होते. तेव्हा नेमका कोणता व्यवसाय करायचा हे निश्चित केले नव्हते. महानगरांमधील कचरा व्यवस्थापनाचे गणित अत्यंत विस्कळीत आहे. याबाबत चर्चा करत असतानाच कचरा व्यवस्थापनाबाबत माहिती घेण्याचे त्यांनी ठरवले. त्याकरिता पुण्यातील दहा लहान-मोठय़ा हॉटेलमध्ये जाऊन त्यांनी चौकशी केली. हॉटेल व्यवसायाचे कचरा व्यवस्थापन, विल्हेवाट याबाबत व्यावसायिकांशी चर्चा केल्यानंतर वेळेवर कचरा नेण्यासाठी आणि योग्य ठिकाणी टाकण्यासाठी महापालिकेच्या लोकांना विनंती करावी लागते, असे अनेक हॉटेल चालकांनी सांगितले. त्यानंतर कमीत कमी जागेत नैसर्गिक पद्धतीने कचरा जिरवण्यासाठीची उत्पादने तयार करण्याची कल्पना पुढे आली.

कंपोस्ट खत तयार करण्याआधी बाजारात उपलब्ध असलेल्या दहा-बारा खतांचे नमुने घेऊन त्यांचा अभ्यास या तिघांनी केला. त्यानंतर कंपनीच्या उत्पादनासाठी एक प्रक्रिया त्यांनी तयार केली. जेणेकरून कंपनीचे उत्पादन गुणवत्तेबाबत सरस ठरेल. विविध खतांचा अभ्यास करून त्यांनी ऑरगॅनिक कंपोस्ट तयार केले. तर, पॉटिंग मिक्स पावडर ही कंपोस्ट, कोकोपीठ, नीम पावडर यांच्या मिश्रणापासून तयार करण्यात आली. एक कुंडी आणून त्यामध्ये माती न टाकता थेट पॉटिंग मिक्स पावडर टाकल्यानंतर वेगळ्या खतांची रोपांना गरज राहत नाही. रोपांना आवश्यक पोषकद्रव्ये या पावडरमधून दिली जातात. तसेच ही पावडर पाणी जास्त वेळ पकडून ठेवते. कंपनीची ही उत्पादने ‘सॉइल सत्त्व’ या ब्रॅण्डने विकली जातात.

उत्पादनाची पहिली आवृत्ती तयार झाली. त्यानंतर उत्पादनांची गुणवत्ता जोखण्यासाठी सरकारी आणि खासगी प्रयोगशाळांमध्ये त्यांची चाचणी करण्यात आली. प्रयोगशाळांमधून उत्पादनांबाबत चांगला अहवाल आल्यानंतर उत्पादनांची विक्री करण्याचे ठरविण्यात आले. मात्र, बाजारात उत्पादने कशी आणायची हा मोठा प्रश्न समोर होता.

पहिले दीड वर्ष पुणे आणि परिसरामध्ये भरणाऱ्या विविध कृषी प्रदर्शनांमध्ये उत्पादने विक्रीसाठी ठेवण्यास सुरुवात करण्यात आली. उत्पादनांची चांगली विक्री देखील झाली. ग्राहकांकडून चांगला प्रतिसाद येण्यास सुरुवात झाली. उत्पादनांच्या पॅकिंगवर संपर्क क्रमांक असल्याने प्रदर्शनाव्यतिरिक्तही उत्पादनांना मागणी येऊ लागली. पुण्याबाहेरून येणाऱ्या मागणीला पुरवठा करण्यासाठी घरपोच सेवा सुरू करण्यात आली. अशा प्रकारे व्यवसाय विस्तारत गेला.

पुण्यासारख्या महानगरांमध्ये अपार्टमेंट, फ्लॅट व्यवस्था आहे. त्यामुळे साहजिकच जागेची अडचण असते. मात्र, एका घरात एकदोन कुंडय़ा असतातच किंवा सर्वसामान्यपणे प्रत्येक घरी तुळस तरी असतेच असते. हा हिशोब करून कंपोस्ट खत आणि पॉटिंग मिक्स पावडरची अनुक्रमे एक आणि दोन किलोची पाकिटे तयार केली. बाजारातील इतर उत्पादनांचे एक किलोचे पाकिट एक महिना वापरत असाल, तर आमच्या कंपनीचे एक किलोचे पाकिट तीनचार महिने सहज पुरेल. एवढी गुणवत्ता आमच्या उत्पादनांची आहे. कुंडीमधल्या मातीतील पोषक द्रव्ये रोप घेत असते. मात्र, एक वेळ अशी येते, की कुंडीमधल्या मातीमधील पोषकता संपते. त्यामुळे आमची उत्पादने रोपांना आवश्यक असणारी पोषक द्रव्ये पुरवतात. कंपोस्ट आणि पॉटिंग मिक्स पावडर प्रथमत: मातीमध्ये मिसळून त्याची पोषकता वाढवतात आणि त्यानंतर उर्वरित पोषक द्रव्ये झाडांना देतात. त्यामुळे झाडांची चांगली वाढ होते, ही आमच्या उत्पादनांची प्रमुख वैशिष्टय़े आहेत, असे नितीन रंगदाळ सांगतात.

अनुपमा आणि रवींद्र हे कंपनीचे संस्थापक संचालक आहेत. तर नितीन व्यवस्थापक म्हणून काम पाहतात. अनुपमा या एमएससी मायक्रोबायोलॉजिस्ट आहेत. रवींद्र कृषी पदवीधर आहेत तर नितीन यांनी बीई मेकॅनिकल ही अभियांत्रिकीची पदवी घेतली आहे. पुण्यामध्ये कंपनी आता चांगली स्थिरावली असून त्यांच्या उत्पादनांना सर्वदूर मागणी आहे. सोमाटणे फाटय़ाजवळ साळुंब्रे गावात कंपनीचा उत्पादन प्रकल्प आहे. तसेच पुण्यातील विविध उपनगरांमध्ये उत्पादने विक्रीसाठी दुकानांमध्ये ठेवली जातात. उत्पादने पुण्याबरोबरच बेंगळुरू, मुंबई शहरांमध्ये कुरिअरने देखील पाठविली जातात. कंपनीच्या दोन उत्पादनांबरोबरच गार्डन डेव्हलपमेंटअंतर्गत आकर्षक बाग विकसित करणे, ग्रीनवॉलअंतर्गत भिंती सजविणे, वेल विकसित करणे आणि किचन गार्डनअंतर्गत दररोज घरी स्वयंपाकासाठी लागणारे टोमॅटो, मिरची, लेटय़ुस अशा विविध सेंद्रिय पालेभाज्या फळे घरच्या घरी पिकविणे या पद्धतींबाबत सेवा पुरविल्या जातात आणि त्याबाबत मार्गदर्शनही केले जाते.   पुण्यात विविध दुकानांमध्ये उत्पादने विक्रीसाठी ठेवण्यात आली आहेत.

पुण्याबरोबरच मुंबई, कोल्हापूर, सोलापूर, नाशिक अशा विविध शहरांमध्ये आगामी तीन महिन्यांत व्यवसायाचा विस्तार करण्याचा आमचा मानस आहे. स्वस्त, शाश्वत आणि नावीन्यपूर्णतेतून सामाजिक आणि आर्थिक विकास साधण्याचे उद्दिष्ट कंपनीने ठेवले आहे, असेही नितीन नमूद करतात.

prathamesh.godbole@expressindia.com