नारायणगाव : ओतूर शहर आणि परिसरात दहशत माजविणाऱ्या बिबट्याला जेरबंद करण्यात ओतूर वनविभागाला अखेर यश मिळाले आहे. श्री संत चैतन्य विद्यालय, श्री संत गाडगेबाबा महाराज विद्यालय आणि बारदारी रस्ता परिसरात बिबट्याचा वावर असल्याची माहिती नागरिकांकडून वनविभागाकडे देण्यात आली. बिबट्याचा वावर असल्याने या परिसरातील नागरिकांमध्ये घबराट पसरली होती.

बिबट्याला पकडण्यासाठी ओतूर वन विभागाने या परिसरात पिंजरे लावले होते. रात्रीच्या वेळी गस्त घालण्यासाठी विशेष पथक नेमण्यात आले होते. चैतन्य विद्यालयाजवळ लावलेल्या पिंजऱ्यात सुमारे सात वर्षांचा नर जातीचा बिबट्या अडकला. पकडलेल्या बिबट्याला माणिकडोह येथील बिबट निवारा केंद्रात सोडण्यात आले आहे. बिबट्या पकडला गेल्याने या भागातील नागरिकांनी सुटकेचा नि:श्वास टाकला आहे.

या मोहिमेत ओतूर वनपरिक्षेत्र अधिकारी प्रदीप चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली वनपाल सारिका बुट्टे, वनरक्षक विश्वनाथ बेले, किशन खरवडे, वनमजूर गणपत केदार, किशन केदार, फुलचंद खंडागळे, सागर विरनक, साहेबराव पारधी; तसेच आळे येथील रेस्क्यू टीम व ग्रामस्थ सहभागी झाले होते.