पिंपरी : देश बदलतोय, त्याची अनुभूती येत आहे. जय श्रीरामचा नारा दिला जातोय. श्रीरामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठेनिमित्त २२ जानेवारीपासून देशभरात भक्तीची लाट आली आहे, ती यापुढेही कायम राहावी. अयोध्येत श्रीरामलल्लाचे मंदिर झाले. अद्याप काशी आणि मथुरेचे मंदिर व्हायचे आहे. याच मार्गाने पुढे जात काशी-मथुरेतही मंदिर उभारणीचा आमचा संकल्प असल्याचे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या अखिल भारतीय कार्यकारी मंडळाचे सदस्य भैयाजी जोशी यांनी चिंचवड येथे सांगितले.

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रांत कार्यकारिणी सदस्य विनायक थोरात यांच्या अमृतमहोत्सवी वाढदिवसानिमित्त चिंचवडमध्ये अभीष्टचिंतन सोहळा झाला. जोशी आणि संघाचे प्रांत संघचालक नानासाहेब जाधव यांच्या हस्ते थोरात यांचा सत्कार करण्यात आला. प्रांत कार्यवाह डॉ. प्रवीण दबडगावकर, प्रांत प्रचारक यशोधन वाळिंबे, कमल थोरात, अमोल थोरात या वेळी उपस्थित होते.

हेही वाचा…पवना नदीवरील समांतर पुलाचे काम संथगतीने; महापालिकेने ठेकेदाराबाबत घेतला ‘हा’ निर्णय

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

जोशी म्हणाले, की मंदिर वही बनायेंगेचा नारा देत रामभक्तांनी बाबरी ढाचा हटवला. पाचशे वर्षे हृदयाला टोचणारा काटा दूर करून आदर्शवत प्रेरणास्थान निर्माण केले. देशात मंदिरांची कमतरता नाही. मात्र, अयोध्येतील श्रीराम मंदिर हे सर्वार्थाने राष्ट्र मंदिर आहे. समाजाचा सामूहिक आनंद, सामूहिक शक्ती निर्माण करण्याच्या प्रयत्नाचा तो एक भाग आहे. त्या माध्यमातून देशाचे सातवे सोनेरी पान लिहिण्याचे भाग्य तुम्हा-आम्हाला मिळाले आहे.